११८ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:39 AM2019-04-27T00:39:40+5:302019-04-27T00:39:44+5:30
कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी खोटी माहिती भरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ११८ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय ...
कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी खोटी माहिती भरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ११८ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी ही माहिती दिली.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील साडेचार हजार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या प्रक्रियेमध्ये आपली सोयीची बदली व्हावी यासाठी अनेक शिक्षकांनी खोटी माहिती भरली होती. नोकरी सुरू झाल्याची चुकीची तारीख भरणे, अंतराचे खोटे दाखले जोडणे, खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडणे, पती-पत्नी यांपैकी एकजण सरकारी सेवेत नसताना तसा दाखला
जोडणे असे अनेक प्रकार करत एकूण १५८ शिक्षकांनी चुकीची
माहिती भरली होती.
इतर अनेक जिल्हा परिषदांमध्ये अशी चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांविरोधात कारवाई झाली असली तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मात्र अशा शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू होता. शिक्षक संघटनांच्या काही नेत्यांनीही यामध्ये कारवाई होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र
ज्या शिक्षकांवर बदल्यांमध्ये
अन्याय झाल्याने त्यांनी थेट ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यापर्यंत तक्रारी केल्या.
अखेर या शिक्षकांना नोटिसा काढून कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली. यातील ४० शिक्षकांचा खुलासा मान्य करण्यात आला असून उर्वरित ११८ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा
निर्णय घेण्यात आला. यामुळे
प्राथमिक शिक्षकांमध्ये
खळबळ उडाली आहे. या तपासाकडे सर्वांचे लक्ष आहे.
कारवाई झालेले तालुकावार शिक्षक
तालुका शिक्षक संख्या
शाहूवाडी ०१
चंदगड ०५
हातकणंगले ३१
गडहिंग्लज ०८
कागल ०४
भुदरगड ०३
तालुका शिक्षक संख्या
पन्हाळा १९
आजरा ०७
शिरोळ ३४
करवीर ०७
राधानगरी ०६