अकरावी प्रवेशाची दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर, विज्ञान शाखेत 'इतक्या' विद्यार्थ्यांना मिळू शकलेले नाही स्थान
By संदीप आडनाईक | Published: July 8, 2023 06:12 PM2023-07-08T18:12:11+5:302023-07-08T18:12:32+5:30
विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह त्यांची निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा
कोल्हापूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेउ इच्छिणाऱ्या तब्बल २०३८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत स्थान मिळू शकलेले नाही. विज्ञान शाखेच्या २२०३ विद्यार्थ्यांना तर वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमांसाठी सर्वच म्हणजे ७८० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.
दुसऱ्या फेरीनंतर गुणवत्ता, आरक्षण आणि महाविद्यालय प्राधान्यक्रम यांच्या आधारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी कनिष्ठ महाविद्यालयनिहाय शनिवारी संकेतस्थळावरुन तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली.
दुसऱ्या फेरीत वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश क्षमतेपेक्षा १९४ अर्ज कमी आले तर विज्ञान शाखेकडे क्षमतेपेक्षा १८३ अर्ज जादा दाखल झाले आहेत. दुसऱ्या फेरीत विज्ञान शाखेसाठी प्रवेश न मिळालेल्या २०३८ विद्यार्थ्यांना पुढील फेरीत निश्चितपणे कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतचा लघुसंदेश संबंधित विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे कळविण्यात आले आहे. ही निवड यादी आलेले अर्ज, मंजूर तुकड्या आणि क्षमता यांचा विचार करुन तयार करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिवांनी दिली. या विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह त्यांची निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.