वर्षभरात बोगस डॉक्टरांच्या १२ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:10+5:302021-09-02T04:49:10+5:30

कोल्हापूर : दवाखाना चालवायचा परवाना नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्याविरोधात गेल्या वर्षभरात १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...

12 complaints of bogus doctors during the year | वर्षभरात बोगस डॉक्टरांच्या १२ तक्रारी

वर्षभरात बोगस डॉक्टरांच्या १२ तक्रारी

Next

कोल्हापूर : दवाखाना चालवायचा परवाना नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्याविरोधात गेल्या वर्षभरात १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी २ प्रकरणांत डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सहा प्रकरणांची चौकशी सुरू आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही राजरोसपणे बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जातात, त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तालुका समितीने अधिक सक्रिय होऊन काम करणे गरजेचे आहे.

डॉक्टरकीची कोणतीही पदवी न घेता केवळ एखाद्या रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली काम केलेले लोक फक्त अनुभवाचा आधार घेऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या डिग्रीची शहानिशा न करता लोक हातगुण चांगला म्हणून त्याच्याकडे उपचारासाठी रीघ लावतात. चुकून एखाद्या रुग्णाचा जीव गेला की सगळी पोलखोल होते. अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी नगरपालिका, तालुका, महापालिका व जिल्हा स्तरावर बोगस डॉक्टर चौकशी समिती कार्यरत असते. या समितीने आपापल्या कार्यक्षेत्रात प्रॅक्टीस करणाऱ्या सर्व खासगी डॉक्टरांची माहिती संकलित करून त्यांची एकत्रित माहिती जिल्हा आरोग्य विभागाला पाठवायची असते. बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची असते.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अशा १२ तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी २ प्रकरणांतील बोगसगिरी उघडकीस येऊन त्यांच्यावर जिल्हा आरोग्य विभागाने फौजदारी गुन्हा नोंदवला आहे.

----

बोगस आणि अनधिकृत फरक काय

अनेकदा नागरिकांकडून बोगस अणि अनधिकृत डॉक्टरांमध्ये गल्लत केली जाते. ज्या व्यक्तीने डॉक्टरची पदवी घेतलेली नाही, पण तो रुग्णांवर उपचार करत आहेत, अशा व्यक्तींना बोगस डॉक्टर म्हणतात. आणि व्या व्यक्तीने डॉक्टरची पदवी घेतली आहे; पण त्यांना विशिष्ट पद्धतीची उपचार करण्याची परवानगी नाही, तरी ते उपचार करत असतील तर हा प्रकार अनधिकृत असतो. पण गैसरमजातून व चुकीचे उद्देशातूनही अनेकदा अधिकृत डॉक्टरांविरुद्ध तक्रार केली जात असल्याचे आढळले आहे.

----

१९९१ ते २०२० पर्यंतची कारवाई

शोधून काढलेली प्रकरणे : ७३

गुन्हा सिद्ध झालेली प्रकरणे : ५

आरोप सिद्ध न झाल्याने सुटका : ३७

प्रलंबित प्रकरणे : २६

पोलीस तपासावर असलेली : १

व्यक्ती मयत झाल्याने फाईल बंद : ३

---

जिल्ह्यातील अधिकृत रुग्णालये

रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार व्यवसायाची परवानगी दिली जाते. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने परवानगी दिलेली ४२८ खासगी रुग्णालये आहेत.

---

वरील १२ तक्रारींपैकी पन्हाळ्यातील १, हातकणंगलेतील ४ व कोल्हापूर महापालिका अंतर्गत १ प्रकरण आहे. अन्य चार प्रकरणातील डॉक्टर अधिकृत होते. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. दोन प्रकरणांत जिल्हाधिकारीस्तरीय समितीसमोर विषय येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

--

तालुका समितीतील सदस्य

तालुका समितीत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी असतात. नगरपालिका व महापालिका स्तरावर स्वतंत्र समिती असते व जिल्हाधिकारी स्तरावरील समितीत जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक असे अधिकारी असतात.

---

बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी कार्यरत असलेल्या तालुकास्तरीय समितीचे काम चांगले आहे. तालुका समितीचा अहवाल, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी, दप्तर तापसणीनंतर फाईल जिल्हाधिकारीस्तरीय समितीकडे येते. त्यात तथ्य आढळले की तातडीने बोगस डॉक्टरवर कारवाई केली जाते.

-डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

---

Web Title: 12 complaints of bogus doctors during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.