गडहिंग्लज साखर कारखान्याच्या १२ संचालकांचे राजीनामे, कोल्हापूर जिल्हयात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:08 PM2022-01-21T19:08:15+5:302022-01-22T11:17:31+5:30
कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत संचालकांनी आपले राजीनामे दिले.
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान १२ संचालकांनी अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करून आपल्या संचालकपदाचे राजीनामे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ.एस.एन. जाधव यांच्याकडे शुक्रवारी (२१) दिले. त्यामुळे लवकरच कारखान्यावर प्रशासक येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गडहिंग्लजसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
२०१६ मध्ये तत्कालिन आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, श्रीपतराव शिंदे, संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडी, तत्कालिन मंत्री चंद्रकांत पाटील, संजय घाटगे, प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काळभैरी शेतकरी विकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात तिरंगी चुरशीची लढत झाली होती. त्यात शेतकरी आघाडीला ११ तर काळभैरी आघाडीला ८ जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान, २०१३ मध्ये १० वर्षांसाठी सहयोग तत्त्वावर कारखाना चालवायला घेतलेल्या 'ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनी'ने ९ महिन्यांपूर्वी कराराची मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडला. उणे नक्त मूल्यामुळे कोणत्याही वित्तीय संस्थांकडून कर्ज न मिळाल्याने विविध संस्थांकडून ठेवीच्या स्वरूपात भांडवल उभे करून अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी कारखाना स्वबळावर सुरू केला आहे.
दरम्यान, आठवड्यांपूर्वीच त्यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करून १२ संचालकांनी 'वेगळी भूमिका' घेतली होती. शुक्रवारी,त्यांनी थेट संचालकपदाचे राजीनामेच दिले. राजीनामे दिलेल्या संचालकांत विरोधी आघाडीचे प्रमुख डॉ. शहापूरकर यांच्यासह अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, प्रकाश चव्हाण, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, प्रकाश पताडे, क्रांतीदेवी कुराडे, सत्ताधारी आघाडीचे सतीश पाटील, दीपक जाधव, विद्याधर गुरबे, जयश्री पाटील यांचा समावेश आहे.
अध्यक्ष शिंदे यांच्या बाजूने
केवळ ६ संचालक आहेत. त्यात उपाध्यक्ष नलवडे, अमरसिंह चव्हाण, बाळासाहेब मोरे, बाळकृष्ण परीट व संभाजी नाईक यांचा समावेश आहे.
अध्यक्ष शिंदेंच्यावरील आरोप
अध्यक्ष शिंदे यांनी संचालकांना विश्वासात न घेता बेकायदेशीर ठरावाव्दारे मनमानी कारभार केला आहे. फायदे - तोटे विचारात न घेता त्यांनी केवळ राजकीय व आर्थिक स्वार्थासाठीच कारखाना विलंबाने सुरू केला. सभासदांचा ऊस न आणता कर्नाटकातील उतारा नसलेला ऊस आणल्यामुळे कारखाना तोट्यात जात आहे. त्यांच्या मनमानीमुळे यापूर्वीही संचालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे २५ डिसेंबर, २०२१ नंतरच्या त्यांच्या कोणत्याही निर्णयास आम्ही जबाबदार नाही,असे निवेदनही १२ संचालकांनी प्रसिद्धीला दिले आहे.
आरोप केवळ व्यक्तिव्देषातूनच
आपण कोणतीही गोष्ट चुकीची व बेकायदेशीर केलेली नाही. ५ वर्षे कारखाना''ब्रिस्क कंपनी''कडेच होता. कंपनीने अचानक कारखाना सोडल्यामुळे आपदधर्म म्हणून ताब्यात घेतला.अर्थसाहाय्य उपलब्ध होण्यात अडचणी आणल्यामुळेच कांही संस्थांकडून ठेवी घेऊन कारखाना पावणे चार कोटीत स्वबळावर सुरू केला आहे. आजअखेर २२ दिवसांत ५२ हजार टन ऊसाचे गाळप करून ५५ हजार क्विंटल साखर आणि १ लाख ४० हजार लिटर्स स्पिरीटचे उत्पादन घेतले आहे.दोन्हीचे मिळून एकूण सुमारे १९ कोटी रुपये उत्पन्न होते.
परंतु, यापुढे गळीतावर परिणाम झाल्यास त्याला १२ संचालकच जबाबदार राहतील. आपल्यावरील सर्व आरोप केवळ व्यक्तिव्देषातूनच केले आहेत.आता सूज्ञ सभासद, शेतकरी व कामगारच त्याला चोख उत्तर देतील. - ॲड.श्रीपतराव शिंदे, अध्यक्ष, गडहिंग्लज कारखाना