मुणगेत गाडीला अपघात १२ जण जखमी : सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील
By admin | Published: May 14, 2014 12:13 AM2014-05-14T00:13:51+5:302014-05-14T00:14:06+5:30
मिठबांव : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवालयानजीक असलेल्या तीव्र उतारावर आज (मंगळवार) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास
मिठबांव : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवालयानजीक असलेल्या तीव्र उतारावर आज (मंगळवार) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील पर्यटकांच्या टेंपो ट्रॅव्हलरला (एम. एम. ०४, जी ७६३२) अपघात झाला. वाहन रस्त्याच्या खाली १० फूट जात स्थिरावले. दरम्यान, गाडीतील कोल्हापूर-जयसिंगपूर येथील किशोर सरनाईक (वय ५५) यांच्या डोळ्यास गंभीर जखम झाली असून चारजण जायबंदी झाले आहेत. या अपघातात एकूण १२ जण जखमी झाले आहेत. आचरा येथील सचिन दगडू कांबळे यांच्याकडे कोल्हापूर येथून सर्वजण आले होते. दुपारनंतर कुणकेश्वर येथे जाण्यासाठी ते निघाले होते. मुणगे येथे असलेल्या तीव्र उताराचा अंदाज न आल्याने वेगात असलेली गाडी वळणावर रस्ता सोडून १० फूट खाली कोसळली. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना बाहेर काढले व उपचारासाठी आचरा येथे दाखल करण्यास मदत केली. तीव्र स्वरूपाच्या उतारास लागून असलेल्या वळणाचा अंदाज चालकास न आल्याने अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या अपघातामध्ये रंजना किशोर सरनाईक (वय ५०, जयसिंगपूर कोल्हापूर), सिंधु आचरेकर (४५, वडगाव कोल्हापूर), विजय संपतराव माने (४५, जयसिंगपूर), सचिन दगडू कांबळे (२७, आचरा), राहुल विवेक आचरेकर (१६, वडगाव कोल्हापूर), अथर्व विजय माने (१०, जयसिंगपूर), देवराज सरनाईक (८, कोल्हापूर), श्रीमती संपतराव माने (७५, जयसिंगपूर), पल्लवी विजय माने (४०, वडगांव), सुजाता विवेक आचरेकर (४८, जयसिंगपूर), स्वरात विजय माने (१७, जयसिंगपूर), गायत्री सरनाईक (वडगांव) या सर्व जखमींवर आचरा आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. (वार्ताहर)