चंदगड तालुक्यात १२ युवकांची फसवणूक
By admin | Published: October 9, 2015 12:26 AM2015-10-09T00:26:29+5:302015-10-09T00:40:32+5:30
रेल्वेत नोकरीचे आमिष : ३७ लाखांचा गंडा
चंदगड : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने चंदगड तालुक्यातील १२ युवकांना धमेंद्र रवींद्र शिरोडकर (डिचोली, गोवा), गोपाळ रावजी केवदे (रा. कोहोळी, ता. कल्मेश्वर, जि. नागपूर) या संशयितांनी ३७ लाखांचा गंडा घातला. याबाबत चंदगड पोलिसांत त्यांनी गुरुवारी तक्रार दाखल केली आहे. डोझर व जेसीबी भाड्याने देणाऱ्या दशरथ रुक्माणा गाडे यांनी डिचोली, गोवा येथील धमेंद्र शिरोडकर यांना जेसीबी भाड्याने दिला होता. त्यांनी मुलगा व पुतण्या नोकरी शोधत असल्याचे शिरोडकरना सांगितले. तेव्हा नागपूरला रेल्वेत ओळखीचे अधिकारी असल्याचे सांगून शिरोडकर यांची नागपूरचे गोपाळ केवदे याच्याशी कलगुंट बीच (गोवा) येथील लॉजवर भेट घडवून आणली. यावेळी केवदेने आपण रेल्वेत अधिकारी असून मुलाला लिपिक म्हणून लावतो, असे सांगून शिरोडकर व केवदे यांनी चंदगडला येऊन गाडे यांच्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले. यावेळी केवदे यांनी आणखी गरजू मुले असतील तर त्यांनाही भेटवा, नोकरी लावतो, असे सांगितले होते. आठ-दहा दिवसांनी गाडे गजानन तुपारे (ढोलरवाडी), प्रशांत पोवार (खडकेवाडा, कागल) व धमेंद्र शिरोडकर यांच्यासह नागपूरला गेले. यावेळी तुपारे व पोवार यांनी पाच लाख ६० हजार केवदेला दिले. त्यानंतर केवदेने चंद्रकांत गाडे, दिगंबर गाडे, महेश पाटील व इतरांना बिलासपूर (छत्तीसगड) येथील हॉटेलवर कर्मचाऱ्यांप्रमाणे गणवेश व कमरपट्टा देऊन ठेवले, पण बरेच दिवस कॉललेटर न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास उपनिरीक्षक गंफले करीत आहेत. (प्रतिनिधी)
फसवणूक झालेल्या युवकांची नावे व रक्कम कंसात - अनिल गुरव - सातवणे (एक लाख दहा हजार), श्रीपाद जोशी - हेरे (दोन लाख पाच हजार), महेश पाटील - इनाम सावर्डे (चार लाख ५२ हजार), दीपक साबळे - सत्तेवाडी (चार लाख २० हजार), प्रवीण पाटील - सरोळी (चार लाख सात हजार), निवृत्ती खातकर - सत्तेवाडी (चार लाख २० हजार), गजानन तुपारे (तीन लाख ३० हजार), प्रशांत पोवार - खडकेवाडा (तीन लाख ७५ हजार), चंद्रकांत गाडे - सातवणे (दोन लाख ५९ हजार), दिगंबर गाडे - सातवणे (८० हजार), दशरथ गाडे - सातवणे (दोन लाख ५० हजार), प्रमोद गुरव - करंजगाव (चार लाख ५६ हजार).