महाडिक परिवाराकडून १२० बेडचे कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:25 AM2021-05-12T04:25:57+5:302021-05-12T04:25:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचे संकट गंभीर होत असताना महाडिक परिवाराच्या पुढाकारातून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाचे संकट गंभीर होत असताना महाडिक परिवाराच्या पुढाकारातून, भाजप, ताराराणी आघाडी आणि कोल्हापूर महापालिकेच्या सहकार्यातून १२० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यातील २० बेड लहान मुलांसाठी राखीव असून सर्व रुग्णांना औषधोपचारासह नाश्ता, भोजनही मोफत पुरवण्यात येणार आहे.
या ठिकाणी अखंड ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जंबो ड्युरा सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
माजी खा. धनंजय महाडिक यांनी सोमवारी हॉकी स्टेडियमजवळील महापालिकेच्या इमारतीची पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशा वेळी महाडिक परिवाराने पुढाकार घेऊन, महापालिकेच्या सहकार्याने हे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले. इमारत पाहणीवेळी त्यांच्यासमवेत सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, संग्राम निकम, महेश वासुदेव, अमृत शहा, शिवप्रसाद घोडके, मनोज नलवडे उपस्थित होते.
कोट
महाडिक परिवार नेहमीच जनतेच्या संकट काळात मदतीसाठी पुढे असतो. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बेड अपुरे पडत आहेत. म्हणूनच हे १२० बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व साधनांची जुळणी करून आठवडाभरामध्ये हे रुग्णालय प्रत्यक्ष सेवेत येईल.
धनंजय महाडिक
माजी खासदार