कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, राधानगरी धरणातून १,२०० क्युसेक विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:14 PM2023-07-21T12:14:01+5:302023-07-21T12:14:49+5:30

सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात

1,200 cusecs discharge from Radhanagari dam, Panchganga river in Kolhapur towards warning level | कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, राधानगरी धरणातून १,२०० क्युसेक विसर्ग

कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, राधानगरी धरणातून १,२०० क्युसेक विसर्ग

googlenewsNext

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे जिल्ह्यातील ६९ बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. नदीतील पाण्याची वाढ इशारा पातळीकडे होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३९ फुटावर गेल्यानंतर नदी इशारा पातळीवर पोहाेचते. सायंकाळी चार वाजता येथील पाणी ३३ फुटावर राहिले.

पाणी पातळी वेगाने वाढत असल्याने पूरबाधीत परिसरातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे राधानगरी धरणातून १,२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

बुधवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली. गुरुवारी दुपारपर्यंतही चांगली उघडीप होती; परंतु, दुपारनंतर मात्र दिवसभर चांगल्या सरी कोसळल्या. त्यामुळे धरण, नदीतील पाणी पातळीत वाढ गतीने होत आहे. पंचगंगा नदीतील पाणी बुधवारी रात्रीच पात्राबाहेर पडले.

भोगावती, कासारी, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा, कुंभी, वारणा, कडवी, धामणी, तुळशी नदीतील पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी, सर्वच नद्यांतील ६९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

तीन धरणे शंभर टक्के भरली


गगनबावडा तालुक्यातील कोदे, चंदगडमधील जांबरे, घटप्रभा ही तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरण ६२ टक्के, तुळशी ३३ टक्के, वारणा ५५ टक्के, दूधगंगा २९ टक्के असा जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा झाला आहे.

सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात

गुरुवारी सकाळी दहापर्यंत झालेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले : १७.२, शिरोळ : १९.१, पन्हाळा : ५१.२, शाहूवाडी : ६५.८, राधानगरी : ४६.५, गगनबावडा : १०४.७, करवीर : ३४.२, कागल : २३.३, गडहिंग्लज : १५.६, भुदरगड : ४६.७, आजरा :२८.४, चंदगड : ४८.

दोन दिवस मुसळधार

आज, शुक्रवार आणि उद्या शनिवारी जिल्ह्यात मुसळधार तर रविवार, सोमवार जोरदार पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पाण्याखालील बंधारे नदीनिहाय असे :

पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ.
भोगावती : हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, खडक कोगे.
कासारी : वालोली, यवलूज, पुनाळ- तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण, कांटे.
हिरण्यकेशी : साळगाव, सुळेरान, चांदेवाडी, दाभील, ऐनापूर, निलजी.
घटप्रभा : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानर्डे-सावर्डे, अडकूर.
वेदगंगा : निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली, चिखली.
कुंभी : कळे, शेनवडे, वेतवडे, मांडुकली.
वारणा : चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी, कोडोली.
कडवी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते -सावर्डे, सरुड पाटणे.
धामणी : सुळे.
तुळशी : बीड.
 

Web Title: 1,200 cusecs discharge from Radhanagari dam, Panchganga river in Kolhapur towards warning level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.