कोल्हापूर जिल्ह्यात गावे १२००, पर्जन्यमापक ७६; ‘महावेध’ योजनेचे मागील काही वर्षे नुसतेच गुऱ्हाळ

By राजाराम लोंढे | Published: July 1, 2024 05:35 PM2024-07-01T17:35:49+5:302024-07-01T17:36:14+5:30

अचूकता नसल्याने शेतकऱ्यांना फटका 

1200 villages, 76 rain gauges in Kolhapur district, Farmers hit due to lack of accuracy | कोल्हापूर जिल्ह्यात गावे १२००, पर्जन्यमापक ७६; ‘महावेध’ योजनेचे मागील काही वर्षे नुसतेच गुऱ्हाळ

कोल्हापूर जिल्ह्यात गावे १२००, पर्जन्यमापक ७६; ‘महावेध’ योजनेचे मागील काही वर्षे नुसतेच गुऱ्हाळ

राजाराम लोंढे

कोल्हापूर : अतिवृष्टी, गारपीटची नुकसानभरपाई शासनाच्या पर्जन्यमापकाच्या आधारे दिली जात आहे. पण, कोल्हापूर जिल्ह्यात १२०० गावे आणि जेमतेम ७६ पर्जन्यमापक आहेत, मग पाऊस मोजायचा कसा?

लहरी हवामानामुळे एका गावात ढगफुटीसारखा पाऊस होतो, तर त्याच्या शेजारच्या गावात साधा शिडकावाही नसतो. सरासरी आकडेवारी शासनाकडे सादर केली जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही भरपाई मिळत नाही. यासाठी राज्य शासनाचा ‘कृषी विभाग’ व ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस’ यांच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्राचा ‘महावेध’प्रकल्प मागील काही वर्षांपूर्वी सुरू केला; पण या पथदर्शी प्रकल्पाला म्हणावी एवढी गती मिळालेली नाही.

देशातील ६३ टक्के लोकांचे जीवन व अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. शेती पाण्यावर आणि पाणी पावसावर अवलंबून आहे. पाणी नियोजनात सर्वांत पहिला टप्पा येतो पाऊस मोजण्याचा; पण ही यंत्रणा सक्षम नाही, राज्यात सरासरी ५० गावांसाठी एक पर्जन्यमापक आहे. एकाच गावात असमान पाऊस पडतो, अहवाल मात्र मंडलनिहाय असलेल्या पर्जन्यमापकावरून दिला जातो.

यासाठी काही वर्षांपूर्वी कृषी विभागाने स्वयंचलित हवामान केंद्राचा ‘महावेध’ प्रकल्प आणला होता. त्यातून राज्यात दहा हजार स्वयंचलित पर्जन्यमापक बसवले जाणार होते. पथदर्शी म्हणून २०६१ बसवले; पण मागील काही वर्षात या प्रकल्पाने जागाच सोडली नाही. गेली पाच वर्षे सत्तेच्या खुर्चीचा खेळ सुरू आहे. पाच वर्षांत तीन कृषी मंत्री राज्याने पाहिले पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या या प्रकल्पाकडे कोणाला बघण्यास वेळ नाही.

हिवरे बाजार गावात तीन पर्जन्यमापक

गावाच्या विकासात पाण्याचे नियोजनही महत्त्वाचा घटक आहे. हिवरे बाजार (अहमदनगर) येथे गावातच तीन पर्जन्यमापक बसवले आहेत. वर्षभरात किती पाऊस झाला, पाण्याचा साठा किती आणि त्यानुसार वर्षभर नियोजन केले जाते. त्यामुळे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात एक तरी पर्जन्यमापक बसवणे गरजेचे आहे.

पारंपरिक पर्जन्यमापकाची अचूकता कमीच

जिल्ह्यात पाटबंधारे विभागाची धरणक्षेत्रातील पर्जन्यमापक वगळता प्रत्येक मंडल कार्यक्षेत्रात एक बसवले आहे. जून ते ऑक्टोबरमध्ये संबंधित महसूल कर्मचाऱ्याने सकाळी आठ वाजता पावसाचे मोजमाप करून अहवाल द्यायचा असतो; पण या पारंपरिक पर्जन्यमापकाची अचूकता कमी असल्याने अनेकवेळा शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो.

पर्जन्यमापक यासाठी हवीत..

  • पाऊस किती झाला हे अचूक समजते
  • गावात अतिवृष्टी झाली तरी वा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला तर त्याची अधिकृत नोंद होते.
  • पेरणी योग्य पाऊस झाला की नाही हे समजते.
  • गावतलाव, विहिरीच्या पाणी साठ्याचा अंदाज येतो.
  • पाणी वाहून किती जाते, किती मुरवता येते यासह एकूणच पाण्याचा हिशोब ठेवता येतो.


स्वयंचलित पर्जन्यमापक असे काम करते 

  • या याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्ह अंदाज लावता येतो. यामध्ये घड्याळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो.
  • या पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस, तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर/तास) मोजता येते. या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवड्याचा एकूण पाऊसही मोजता येतो; म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते.


सरकारने स्वयंचलित हवामान केंद्रांचे जाळे विस्तारले पाहिजे. किमान ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात स्वयंचलित हवामान केंद्र प्राधान्याने बसवण्याची गरज आहे.. - राहुल रमेश पाटील. सांगली ( मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान)

Web Title: 1200 villages, 76 rain gauges in Kolhapur district, Farmers hit due to lack of accuracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.