एजंटाला १२ हजार मग तपासणीसाठी किती ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:40+5:302021-07-20T04:18:40+5:30
कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ...
कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या केंद्रापर्यंत ग्राहक गर्भवतींना चाचणाीसाठी आणण्यासाठी एजंट ठेवल्याचे समोर आले. यामुळे गर्भलिंग चाचणीचे जिल्ह्यात रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. छाप्यात एजंटांना १२ हजार रुपये दिले जात होते तर चाचणीसाठी एकूण किती पैसे घेतले जातात याचा शोध पोलीस घेत आहेत. चाचणीनंतर मुलगा, मुलगी सांगण्यासाठी ७ आणि ९ या सांकेतिक भाषेचा वापर केला जात होता.
कोल्हापूरहून परितेकडे जाताना जुन्या पेट्रोल पंपाजवळ साताप्पा खाडे यांच्या घरात गर्भलिंग तपासणी केंद्र सुरू होते. हे केंद्र मुख्य सूत्रधार राणी कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), बनावट डॉक्टर महेश सुबराव पाटील (३०, रा. सिरसे, ता. राधानगरी) हे दोघे चालवतात. त्यातील राणीवर गर्भलिंग चाचणी प्रकरणीच २०१७ मध्ये कागल पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. परिणामी गर्भलिंग चाचणीत केंद्र चालविण्यात राणी सराईत असल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे. तिचा सहकारी महेश बनावट डॉक्टर आहे. त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. त्याने डिप्लोमा केला आहे.
सचिन आणि राणी दोघे मिळून केंद्र चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या केंद्रात एजंट म्हणून भारत सुकुमार जाधव (रा. हुपरी, ता. हातकणंगले), सचिन दत्तात्रय घाटगे (रा.कसबा वाळवे, ता. राधानगरी) एजंट म्हणून काम करतात. या एजंटांमार्फत माळी यांनी पत्नी आणि आई राजामाता यांना घेऊन केंद्रावर तपासणीसाठी आले. त्याचवेळी पोलिसांनी छापा पडला. त्यानंतर चाचणीचे रॅकेट उघड झाले.
माळी यांची चाचणी झाल्यानंतर एजंटांना १२ हजार रुपये मिळणार होते. सूत्रधार राणी कांबळे फरार असल्याने ७ आणि ९ अंकातील मुलासाठी कोणता आकडा वापरला जात होता, हे स्पष्ट झाले नाही. हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी महिलेच्या पती, सासूसह , केंद्रचालक, एजंट, घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे.
चौकट
डायरी सापडली
परितेमधील गर्भलिंग चाचणी केंद्रातील छाप्यात एक डायरी सापडली आहे. या डायरीत सांकेतिक भाषेत काहीजणांची नावे आहेत. मुख्य सूत्रधारास अटक झाल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. चाचणीनंतर मुलगी असल्यास गर्भपात कुठे केले जात होते, मुलीच्या गर्भाची विल्हेवाट कुठे लावली जात होती, आतापर्यंत किती चाचणी केल्या, चाचणीसाठीचे सोनोग्राफीचे यंत्र कुठून आणले, अशी माहिती पुढे येणार आहे.
दोन मुलीनंतर
माळी यांना पहिल्या दोन मुली आहेत. त्यानंतर पुन्हा पत्नी गर्भवती राहिल्यानंतर परितेमध्ये येऊन गर्भलिंग चाचणी करून घेताना रंगेहात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. परितेच्या प्रकरणावरून अजूनही जिल्ह्यात गर्भलिंग निदान होऊन गर्भातच मुलींना मारले जात असल्याचे समोर आले आहे.