अंबाबाई मंदिर विकासाचा १२५ कोटींचा आराखडा
By admin | Published: March 17, 2015 11:58 PM2015-03-17T23:58:13+5:302015-03-18T00:03:25+5:30
मुख्यमंत्र्यांना सादर होणार : आता लक्ष निधी मंजुरीकडे1
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर विकासाचा सुधारित आराखडा फोट्रेस कंपनीच्यावतीने सादर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील हा आराखडा १२५ कोटींचा असून, तो मुख्यमंत्र्यांसमोर सादर होणार आहे. आज, बुधवारी होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या पहिल्या टप्प्यासाठीच्या निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. दहा दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फोट्रेस कंपनीच्या अधिकाऱ्यांना अंबाबाई मंदिराच्या २५० कोटींच्या विकास आराखड्याचे तीन टप्पे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात फक्त अंबाबाई मंदिर परिसराचा विकास, भूसंपादन आणि नागरिकांचे पुनर्वसन यांचा समावेश करण्यास सांगितले होते. त्यानुसार फोर्ट्रेस कंपनीने पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा तयार केला आहे. १२५ कोटींचा हा आराखडा मुख्यमंत्र्यांपुढे सादर होऊन अर्थसंकल्पात त्यासाठीच्या निधीची तरतूद केली जाईल. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.
बैठकीत करण्यात आलेल्या सूचनेनुसार फोट्रेस कंपनीने अंबाबाई मंदिराचा १२५ कोटींचा सुधारित आराखडा तयार केला आहे. पालकमंत्री आणि मी दोघांनीही शासनाकडे निधीसाठीचा पाठपुरावा केला आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.
- राजेश क्षीरसागर, आमदार