डायरीतील ‘त्या’ १२५ संशयित महिलांची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:44+5:302021-07-23T04:16:44+5:30
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील परिते येथे बेकायदा गर्भलिंग निदान करताना छापा टाकून अटक केलेल्या टोळीतील मुख्य सूत्रधार महेश पाटील ...
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील परिते येथे बेकायदा गर्भलिंग निदान करताना छापा टाकून अटक केलेल्या टोळीतील मुख्य सूत्रधार महेश पाटील आणि राणी कांबळे यांच्या पोलीस कोठडीत दि. २५ जुलैपर्यंत वाढ केली. दरम्यान, राणी कांबळे हिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, छापा टाकल्यानंतर घटनास्थळी सापलेल्या दोन डायऱ्यांतून सांकेतिक भाषेतील सुमारे १२५ संशयितांची नावे व पत्ते निष्पन्न झाले आहेत. या महिलांनी या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर तपासणी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संशयित महिला व त्यांच्या पतींनाही पोलीस ठाण्यात बोलावून चौकशीचे काम सुरू केले आहे.
परिते येथे बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर करवीर पोलिसांनी रविवारी (दि. १८) छापा टाकला. या ठिकाणी मुख्य सूत्रधार महेश पाटीलसह एकूण पाचजणांना अटक केली. त्यावेळी पळून गेलेली सूत्रधार राणी कांबळे हिलाही पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली. अटक केलेल्यांची पोलीस कोठडी गुरुवारी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी महेश पाटील व राणी कांबळे या सूत्रधारांच्या पोलीस कोठडीत रविवारपर्यंत वाढ केली आहे. छाप्यामध्ये सापडलेल्या डायरीतील सुमारे १२५ महिलांची नावे व पत्ते निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. या प्रकरणी चौकशीत, गर्भलिंग निदान प्रकरणात तपासणीसाठी ग्राहक आणण्यासाठी कमिशनवर मोठ्या संख्येने एजंट ठेवल्याची माहिती पुढे आली आहे, त्यानुसार काहींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यावरून मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद राळेभात तपास करीत आहेत.