पी.एम.किसान फसवणुकीमुळे १२५० तरुणांचे करिअर धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:08 PM2020-10-31T12:08:47+5:302020-10-31T12:11:26+5:30
PM Kisan Scheme , Framar, kolhapurnews नावावर जमीन नसताना शासनाची फसवणूक करून पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा (पी. एम. किसान) लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील १२५० तरुणांचे करिअर धोक्यात येणार आहे. त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली शासनाच्या पातळीवर सुरू आहेत. आजोबाच्या नावावर जमीन आणि नातवाने लाभ घेतल्याचे चौकशीत उघड झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : नावावर जमीन नसताना शासनाची फसवणूक करून पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा (पी. एम. किसान) लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील १२५० तरुणांचे करिअर धोक्यात येणार आहे. त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली शासनाच्या पातळीवर सुरू आहेत. आजोबाच्या नावावर जमीन आणि नातवाने लाभ घेतल्याचे चौकशीत उघड झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.
सातत्याने नैसर्गिक संकटाने अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजना सुरू केली. शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार २१ लाभार्थी आहेत. मात्र, बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्याची चौकशी गेली महिनाभर जिल्ह्यात सुरू होती. यामध्ये १३ हजार ४३७ खातेदारांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
यामध्ये ९५०० लाभार्थ्यांच्या नावावर जमीनच नाही तर एकाच कुटुंबातील पती-पत्नी यांनी लाभ घेतलेले १५६६ जण असून २३७१ नोकरदार व आयकर परतावा करणारे आहेत. विशेष म्हणजे ९५०० जमीन नसलेल्या लाभार्थ्यापैकी १२५० हे तरूण आहेत. जे करिअरच्या उंबरठ्यावर आहेत. ही फसवणूक त्यांच्या चांगलीच अंगलट येणार असून त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. या तरुणांनी आताच शासनाची फसवणूक केली असेल तर भविष्यात सेवेत जाऊन वेगळे काय करणार? अशी धारणा शासकीय यंत्रणेची झाली आहे. त्यामुळे त्यांचे करिअर धोक्यात आले आहे.
पैसे भरले नाहीतर रेशन बंद
शासनाची फसवणूक करून पेन्शनचा लाभ घेतलेल्या खातेदारांकडून १५ टक्के व्याजदराने लाभ घेतलेली रक्कम वसूल होणार आहे. जी ही रक्कम भरणार नाहीत, त्यांचे रेशन बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
यांना लाभ मिळणार नाही -
- शेतकरी आहे, पण सरकारी कर्मचारी आहे.
- सरकारी सेवेतून सेवानिवृत्त
- मासिक पेन्शन दहा हजार मिळते.
लोकमतमध्येच सर्वप्रथम वृत्त
पी. एम. किसान योजनेत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिले होते. हे वृत्त तंतोतंत ठरले आहे.
फसवणूक केलेले लाभार्थी -
- जमीन नसलेले - ९५०० पैकी १२५० तरुण
- पती-पत्नी दोघे लाभार्थी - १५६६
- नोकरदार, आयकर भरणारे - २३७१