‘निर्भया’चा १२६ तरुणांना दणका
By admin | Published: August 17, 2016 11:45 PM2016-08-17T23:45:41+5:302016-08-17T23:57:19+5:30
‘खाकीचा प्रसाद’ : रेकॉर्डवर येणाऱ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; तरुणी, महिला सुरक्षेसाठी पथक
एकनाथ पाटील -- कोल्हापूर --शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींची छेड काढणाऱ्या १२० तरुणांना ‘निर्भया’ पथकाने ‘खाकीचा प्रसाद’ दिला आहे.
कॉलेजला जातो, म्हणून घरातून बाहेर पडलेल्या मुलांचे पराक्रम पाहून पालकवर्गाला चिंता लागली आहे. रेकॉर्डवर येणाऱ्या अशा तरुणांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला वेळीच सावरावे, असे मत पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील १४६ पोलिस ठाण्यांमध्ये तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८ आॅगस्टला ‘निर्भया’ पथकाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यांमध्ये दहा पथके तैनात करण्यात आली. त्यामध्ये एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांना स्वतंत्र ड्रेसकोड व दिमतीला वेगवान दुचाकी देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये तरुणी व महिलांची छेड काढणाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडण्याचे आदेशही पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिले आहेत. या निर्भया पथकामुळे तरुणी व महिलांना आपण घराबाहेर पडल्यानंतर परत घरी येईपर्यंत सुरक्षित आहोत, ही भावना निर्माण झाली पाहिजे, अशा पद्धतीचे भयमुक्त वातावरण सर्वत्र पाहायला मिळाले पाहिजे हा मुख्य उद्देश ‘निर्भया’ पथकाच्या कामगिरीचा आहे.
‘निर्भया’ पथकाने आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी तरुणींची छेड काढणे, टाँटिंग करणे, रस्ता अडवणे, पाठलाग करणे, हातवारे करणे अशा १२६ तरुणांना खाकीचा प्रसाद देत कारवाई केली आहे.
अतिशय हुशारीने पथके कारवाई करत आहे. त्यांच्या कारवाईची चाहूल कोणालाच लागत नाही.
छेडछाड करत असल्याचे व्हिडीओ शूटिंग करून त्याला रंगेहात पकडले जाते. पथकाच्या सर्व्हेनुसार ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालयीन तरुणींची बसस्टॉप, एस. टी. बस, कॉलेज कॅम्पस आदी ठिकाणी छेडछाड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पथकाची नजर : या ठिकाणावर राहणार कायमस्वरूपी वॉच
विवेकानंद कॉलेज (पानटपरी), शहाजी कॉलेज (दसरा चौक), महावीर कॉलेज (बसस्टॉप), कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, आझाद चौक, शाहू मैदान, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, विद्यापीठ हायस्कूल, भवानी मंडप, शिवाजी चौक बसस्टॉप, गंगावेश बसस्टॉप, के.एम.सी. कॉलेज, न्यू कॉलेज (परिसर), पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमती गर्ल्स हायस्कूल चौक, भोई गल्ली, एनसीसी भवन परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, केआयटी कॉलेजकडे जाणारा रस्ता व भारती विद्यापीठ परिसर, रंकाळा परिसर, महावीर गार्डन यासह कॉलेज परिसरातील पानटपरी, हॉटेल, आइस्क्रीम पार्लर, कँटिन.
या कलमाखाली होते कारवाई
सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन व छेडछाड करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अॅक्ट ११०/११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.
या कलमाखाली कारवाई होणाऱ्या तरुणांची पोलिस रेकॉर्डला नोंद होऊन त्यांच्या हालचालींवर नेहमी पथक लक्ष ठेवून असणार आहे.
‘‘िनिर्भया’ पथकाची बैठक
निर्भया’ पथकाची बुधवारी पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बैठक घेतली. यावेळी आठ दिवसांच्या कारवाईचा आढावा घेत दुसऱ्या टप्प्यातील कारवाईचे नियोजन करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधीक्षकांसह निरीक्षक व पथकातील अधिकारी, कर्मचारी व ‘कोल्हापूर वुई केअर’च्या तीस महिला सदस्या उपस्थित होत्या.