बारावीचा निकाल : कोल्हापूर विभाग ९९.६७ टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 07:47 PM2021-08-03T19:47:02+5:302021-08-03T19:49:00+5:30
HSC Exam Result Kolhapur : उच्च शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी चार वाजता ऑनलाईन जाहीर झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात कोल्हापूर विभाग ९९.६७ टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकावर राहिला. या निकालात यंदा ७.२५ टक्क्यांनी वाढ झाली.
कोल्हापूर : उच्च शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी चार वाजता ऑनलाईन जाहीर झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात कोल्हापूर विभाग ९९.६७ टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकावर राहिला. या निकालात यंदा ७.२५ टक्क्यांनी वाढ झाली.
कोल्हापूर विभागातून अर्ज भरलेले आणि मूल्यांकनास पात्र ठरलेले एकूण १,१७,३१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोरोनामुळे वर्ग भरले नसल्याने अभ्यासाची चिंता, परीक्षा होणार की नाही याबाबतचा तणाव, मूल्यमापनाचे सूत्र लवकर ठरले नसल्याने वाढलेली धाकधूक आणि लांबलेल्या निकालाची प्रतिक्षा अशा वातावरणात वर्षभर विद्यार्थी होते.
या विभागातील ३८८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. बारावी समकक्ष ह्यआयटीआयह्णचे काही पेपर अद्याप झाले नसल्याने ८८, तर पुन:प्रविष्ठ (रिपीटर) ५१ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले. कोल्हापूर विभागामध्ये ९९.९१ टक्क्यांसह सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकविला. सांगली जिल्हा ९९.६१ टक्क्यांसह द्वितीय,तर कोल्हापूर जिल्हा ९९.५३ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर राहिला.
यावर्षी नोंदणी केलेले १,१७,७०५ मूल्यांकनास पात्र ठरले. त्यातील १,१७३१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ६३,१९९ मुले उत्तीर्ण झाली असून त्यांची टक्केवारी ९९.५८ आहे. ५४११८ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी ९९.७६ आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ०.१८ टक्के अधिक आहे.
या निकालाची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी दिली. दरम्यान, बहुतांश विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनच्या माध्यमातून निकाल जाणून घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांवर मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
जिल्हानिहाय निकाल
- सातारा : ९९.९१ टक्के
- सांगली : ९९.६१ टक्के
- कोल्हापूर : ९९.५३ टक्के
कोल्हापूर विभागाचा निकाल दृष्टिक्षेपात
- एकूण कनिष्ठ महाविद्यालय : ८२२
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : १,१७,३१७
- विशेष प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थी : ४७१५३
- प्रथम श्रेणी :५१३०४
- द्वीतीय श्रेणी : १८४८५
- उत्तीर्ण श्रेणी : ३७३
- पुन:प्रविष्ठ उत्तीर्ण विद्यार्थी : ४५७२
- सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी खेळाडू : ११४९