१३ शाळांमध्ये मल्लखांबाचे ‘मैदान’

By admin | Published: November 7, 2014 12:28 AM2014-11-07T00:28:13+5:302014-11-07T00:48:46+5:30

जिल्हा परिषद : आरोग्यासाठी शिक्षण विभागाचा निर्णय

13 'Malla' field in schools | १३ शाळांमध्ये मल्लखांबाचे ‘मैदान’

१३ शाळांमध्ये मल्लखांबाचे ‘मैदान’

Next

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -मल्लखांब खेळ काळाच्या ओघात कालबाह्य होत आहे. या मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली आहे. यासाठी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांनी विशेष लक्ष घातले असून, हा खेळ शिकविण्यासाठी उत्सुक असणाऱ्या शाळांची नावे पाठविण्याच्या सूचना तालुका शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अशा १३ निवडलेल्या शाळांमध्ये मल्लखांबाचे मैदान तयार करण्यासाठी येणार खर्च जिल्हा परिषद करेल.
शरीराला लवचिकता, चपळपणा यावा म्हणून मल्लखांब खेळला जातो. राजे, राजवाडे यांच्या काळापासूनच हा खेळ आहे. कमीत कमी खर्चाचा खेळ म्हणूनही ओळख आहे. मल्लखांबामुळे शरीरातील सर्वच अवयवांना चांगला व्यायाम होतो. शरीर पिळदार होते. सांघिक भावना वाढीस लागते. त्यामुळे शारीरिक तंदुरूस्तीसाठी मल्लखांब चांगला खेळ मानला जातो. मात्र, अलीकडे सर्वत्र मल्लखांब म्हणजे काय, असे विचारले जात आहे. इतका खेळ मागे पडत चालला आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते मल्लखांब खेळ खेळत असतात.
फक्त एका खांबावर विविध खेळ खेळले जातात. खेळातील प्रात्यक्षिके चित्तथरारक असतात. त्यामुळे प्रात्यक्षिक पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येतात. हृदयाचा ठोका चुकतो. सराव चांगला झाला नसल्यास शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. कष्ट आणि सरावातील सातत्य असल्यासच हा खेळ खेळता येतो. अन्यथा शरीराची साथ मिळत नाही.
पूर्वी यात्रा, जत्रांमध्ये खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले जात होते. मात्र, क्रिकेटचे फॅड रूजल्यामुळे मल्लखांब खेळ हद्दपार होत आहे. शासकीय पातळीवरही या खेळाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे पुढील पाच-सहा वर्षांत मल्लखांब खेळ इतिहासजमा होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे, म्हणून मल्लखांब खेळाला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्यासठी तायशेटे शिक्षण सभापती झाल्यानंतर प्रयत्न करत आहेत. सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शिक्षणाधिकारी यांना मल्लखांब शिकविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शाळांची यादी देण्याचे आवाहन केले आहे. शाळा निवडीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक १३ शाळांची निवड करून मैदान तयार करण्यात येणार आहे. मैदानासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी जिल्हा परिषद
उचलणार आहे.

मल्लखांब खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. झपाट्याने मागे पडत असलेल्या खेळाचे धडे शाळांमधून दिल्यास पुन्हा चांगले दिवस येतील. त्यामुळेच इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील १३ शाळांची निवड करून मल्लखांबासाठी मैदान करण्याचे नियोजन आहे.
- अभिजित तायशेटे (सभापती, शिक्षण समिती,जिल्हा परिषद)

Web Title: 13 'Malla' field in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.