कोल्हापूर जिल्ह्यातील १३ आमदारांना मिळाले मंत्रिपद, केंद्रीय मंत्रिमंडळात अजूनही कुणाला मिळाली नाही संधी
By विश्वास पाटील | Published: November 5, 2024 06:52 PM2024-11-05T18:52:39+5:302024-11-05T18:53:16+5:30
शह-काटशहाच्या राजकारणाचाही परिणाम
विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात आतापर्यंत फारच जेमतेम प्रतिनिधित्व मिळाले आहे. या जिल्ह्यातील १३ आमदारांना मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यातील सहा नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. इतरांना राज्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले. क्षमता असूनही कोल्हापूरला मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही, त्याचा परिणाम कोल्हापूरच्या विकासावर झाल्याचे दिसते. केंद्रीय मंत्रिमंडळात तरी अजूनही कुणालाच संधी मिळालेली नाही.
कोल्हापूरच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील यांचे नेतृत्व मानण्यात विभागणी झाली होती. त्याशिवाय महाराष्ट्र स्थापनेनंतर सुरुवातीची काही वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. हा पक्ष पुलोद वगळता फारसा सत्तेत नव्हता. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यात अडचणी आल्या.
गटातटाच्या राजकारणातही एखाद्याला मंत्रिपद मिळणार अशी हवा तयार झाली की त्याचा विधानसभेलाच कसा पाडाव करायचा असेही राजकारण पी. एन. पाटील यांच्यासह कांहीच्या बाबतीत घडले आहे. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर शिवसेनेत राजेश क्षीरसागर-चंद्रदीप नरके-प्रकाश आबिटकर यांच्यात अशीच रस्सीखेच मंत्रिपद मिळविण्यावरून झाली. गेल्या निवडणुकीत आबिटकर शपथ घ्यायला म्हणून मुंबईपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या मंत्रिपदावर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी डल्ला मारला.
- भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या घटना समितीचे रत्नाप्पाण्णा सदस्य होते. नोव्हेंबर १९७४ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात माहिती व गृह राज्यमंत्री तसेच फेब्रुवारी १९७५ मध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री होते. नंतर वसंतराव दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात १९७४ ते १९७८ पर्यंत त्यांनी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली.
- वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उदयसिंहराव गायकवाड मंत्री होते. त्यांनी उद्योग, ऊर्जा, सर्वसाधारण प्रशासन, आरोग्य, नागरी पुरवठा तसेच ग्रामीण व शहरी खात्याचे मंत्री म्हणून काम केले.
- शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील १९७८ च्या पुलोद आघाडी सरकारमध्ये श्रीपतराव बोंद्रे कृषी राज्यमंत्री होते.
- कल्लाप्पाण्णा आवाडे यांना १९८३ मध्ये उद्योग व नगरविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. ते कोल्हापूरचे पालकमंत्रीही होते.
- प्रकाश आवाडे १९८५ सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते वस्त्रोद्योग, आदिवासी विकास व विशेष साहाय्य खात्याचे मंत्री झाले.
- दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक हे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या १९९३ ते ९५ मंत्रिमंडळात पाटबंधारे व शिक्षण खात्याचे राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री होते.
- दिग्विजय खानविलकर हे अगोदर आरोग्य राज्यमंत्री व नंतर २००० ते २००४ च्या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री होते. त्यांच्याकडे पालकमंत्री पदाचीही जबाबदारी होती. कोल्हापूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचे मोठे काम त्या काळात झाले.
- दिवंगत बाबासाहेब कुपेकर हे सहकार राज्यमंत्री, विधानसभेचे सभापती आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष होते.
- भरमू पाटील हे अपक्ष निवडून आल्यावर १९९५ ला रोजगार हमी योजनेचे राज्यमंत्री होते.
- पुढे २००४ च्या मंत्रिमंडळात विनय कोरे अपारंपरिक ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार) मंत्री होते.
- आता पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ हे २५ वर्षे आमदार आणि त्यातील १९ वर्षे राज्यमंत्री व मंत्री राहिले आहेत. आता ते वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य खात्याचे मंत्री आहेत. यापूर्वी त्यांनी कामगार कल्याण, ग्रामविकास, पशुसंवर्धन, दुग्धविकास, जलसंपदा या खात्याचा कारभार सांभाळला आहे.
- माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गृह, माहिती व तंत्रज्ञान, सैनिक कल्याण, परिवहन, गृहनिर्माण, अन्न व औषध व ग्रामविकास राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.
- कोल्हापूरचे पालकमंत्रिपद भूषविलेले चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या काळात महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग, कृषी अशा ताकदीच्या खात्यांचा कार्यभार सांभाळला. राज्यमंत्रिमडळात त्यांना दोन नंबरचे स्थान मिळाले. सरकारमध्ये त्यांच्याइतकी सत्ता आणि संधी जिल्ह्यात अन्य कुणालाच मिळाली नाही.
स्वातंत्र्यानंतर पहिल्या दोन निवडणुकीतील आमदार : २५
महाराष्ट्र स्थापनेनंतर १९६२ च्या पहिल्या निवडणुकीनंतरचे विजयी झालेले एकूण आमदार : १४७