नवरात्रौत्सवात १३ नवीन जागांवर पार्किंग
By admin | Published: September 25, 2016 01:15 AM2016-09-25T01:15:28+5:302016-09-25T01:15:28+5:30
अमित सैनी : जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजाची बैठक; पहिल्यांदाच महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १३ नव्या ठिकाणांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. परिसरातील रहिवाशांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात स्तनदा मातांसाठी यंदा प्रथमच ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात २० लाखांहून अधिक भाविक येतात. या परस्थ भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी व नवरात्रौत्सवाच्या नियोजनासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, ‘व्हाईट आर्मी’चे अशोक रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उत्सव नियोजनाची माहिती देण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी अंबाबाई मंदिराच्या परिसराची पाहणी केली.
बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी यंदा १३ नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. उत्सवाच्या दहा दिवसांत येथील रहिवाशांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी शाहू बँकेमागील मैदानाची सोय करण्यात आली आहे. तरी स्थानिकांनी उत्सवकाळात परिसरात किंवा दारात पार्किंग न करता ते शाहू बँकेमागील मैदानात करून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये स्तनदा मातांचीही संख्या जास्त असते. त्यांच्या सोयीसाठी यंदा प्रथमच मंदिराच्या आवारात ‘हिरकणी कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. उत्सवकाळात मंदिराच्या आवारात प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदी असेल. बाह्य परिसरातील हॉटेल्समधील अन्नपदार्थांची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
या ठिकाणी असेल वाहनांचे पार्किंग
४बिंदू चौक
४सरस्वती टॉकीजशेजारी
४विद्यापीठ हायस्कूल गेटसमोर
४मेन राजाराम हायस्कूलचे मैदान
४प्रायव्हेट हायस्कूलचे मैदान
४एमएलजी हायस्कूलचे मैदान
४शिवाजी स्टेडियम
४गांधी मैदान
४पेटाळा मैदान
४दसरा चौक
४सिद्धार्थनगर कमान येथील मैदान
४खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी
४पंचगंगा नदीघाट
४डॉ. झाकीर हुसेन उर्दू व मराठी शाळा, सुसरबाग, लक्ष्मीपुरी
शेतकरी बझारात लॉकर्सची सोय
अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी शेतकरी बझारच्या इमारतीत लॉकर्सची सोय करण्यात आली आहे. लॉकर्स सिस्टीम आणि त्यासाठीचे कर्मचारी पुरविण्याची जबाबदारी देवस्थान समितीची असणार आहे. या ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
भवानी मंडप, शिवाजी चौक ते मंडप ‘नो व्हेईकल झोन’
उत्सवकाळात भवानी मंडपात पार्किंगला मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय शिवाजी चौक ते भवानी मंडप हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे. याशिवाय महाद्वार रोड, गुजरी, जोतिबा रोड, जेल रोड, न्यू महाद्वार रोड, मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर, शिवाजी बोळ, भेंडे गल्ली, एमएलडी रोड, गुरू महाराज वाडा येथील सर्व रस्ते एकेरी मार्ग
एक्स-रे स्कॅनरची प्रतीक्षाच
गेल्या दोन वर्षांपासून एक्स-रे स्कॅनरची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. देवस्थान समितीने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा निविदा काढली आहे. मात्र, त्याबद्दल अद्याप पुढील कार्यवाही झालेली नसल्याने यंदाही नवरात्रौत्सवात एक्स-रे स्कॅनर बसविता येणार नाही. मात्र, दिवाळी दरम्यान हे एक्स-रे कार्यान्वित होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी दिली.