१३ जणांवर ‘शॅडो वॉच’
By admin | Published: June 19, 2016 01:23 AM2016-06-19T01:23:16+5:302016-06-19T01:23:16+5:30
वीरेंद्र तावडे प्रकरण : हिंदुत्ववादी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश
कोल्हापूर : ‘अंनिस’चे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेला हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता डॉ. वीरेंद्र तावडे याचा कोल्हापुरातील कोणा-कोणाशी संपर्क आहे, या दृष्टीने कोल्हापूर पोलिस तपास करीत आहेत. याप्रकरणी १३ जणांवर पोलिसांनी ‘शॅडो वॉच’ ठेवला आहे. या शॅडो वॉचमध्ये काही हिंदुत्ववादी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात पनवेल येथून ‘सीबीआय’ने संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली. सध्या तो पुणे येथील पोलिस कोठडीत असून उद्या, सोमवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपणार आहे. दरम्यान, गोविंद पानसरे हत्येप्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिस तावडेला ताब्यात घेणार आहेत. पानसरे हत्येप्रकरणी तपासावेळी संशयित आरोपी समीर गायकवाडच्या चौकशीवेळी वीरेंद्र तावडे याचे नाव आले होते. त्यामुळे पोलिस तावडेचे कोल्हापुरात कोणा-कोणाशी संबंध आहेत, दाभोलकर हत्येपूर्वी व त्यानंतर त्याने कोणा-कोणाशी फोनवरून संभाषण केले आहे, या दृष्टीने तपास करीत आहेत. त्यामुळे कोल्हापूर, इचलकरंजी, आदी परिसरांतील १३ जणांवर पोलिसांनी शॅडो वॉच ठेवला आहे. यामध्ये पोलिस वेळप्रसंगी गेल्या तीन वर्षांतील संबंधितांचे कॉल डिटेल्स तपासणार आहेत. कोल्हापूर पोलिसांनी तावडेला ताब्यात घेतल्यानंतर पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.
साडविलकर यांना पोलिस बंदोबस्त
कोल्हापुरात पूर्वी हिंदुत्ववादी संघटनेत काम केलेला संजय साडविलकर हे दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदार आहेत. याची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने शनिवारपासून त्यांना बंदोबस्त दिला आहे. त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्रधारी पोलिस नेमल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.(प्रतिनिधी)