१३ वर्षे अंधारात; वीज, पाण्याविना घालमेल
By Admin | Published: May 20, 2015 10:18 PM2015-05-20T22:18:42+5:302015-05-21T00:06:49+5:30
दोडामार्गमधील खांबल कुटुंबियांची व्यथा : ...अन्यथा उपोषणाशिवाय पर्याय नाही--लोकमत विशेष
शिरीष नाईक -कसई दोडामार्ग -कसई दोडामार्ग येथील संजय खांबल यांच्या घरात १३ वर्षे वीज नसल्याने त्यांचे कुटुंब अंधारात आहे. पिण्यासाठी पाण्याची सोयही ग्रामपंचातीने केली नाही. अशा भयानक परिस्थितीत आम्ही जगत आहोत. आम्हाला वीज द्या, पाणी द्या, अशी मागणी वारंवार संंबंधित यंत्रणेकडे केली. मात्र, आमची कोणी दखल घेतली नाही. एकप्रकारे आम्हाला वाळीत टाकल्यासारखे वाटते, अशी संतप्त भावना संजय खांबल यांनी व्यक्त केली. वीज आणि पाणी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा खांबल यांनी दिला आहे. कसई दोडामार्ग ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वीस वर्षांपूर्वी घर बांधले. या घरामध्ये माझी पत्नी संजोक्ता, तीन मुलगे व आई असा परिवार आहे. तेरा वर्षे घरात वीज नाही. अथक प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. कोणी दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त करून संजय खांबल यांनी आपली करूण कहाणी सांगितली.
मी माझ्या परिवारासह येथे राहत आहे. घर बांधल्यानंतर रितसर वीज मीटर मिळावा, म्हणून वीज कार्यालयाकडे मागणी केली. यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, लाईन ओढताना काही विरोधकांनी आमच्या जमिनीतून लाईन जोडू नका, असे सांगितले. त्यामुळे वीज कंपनीने लाईन ओढली नाही.
गेली १३ वर्षे माझे कुटुंब अंधारात आहे. माझ्या तिन्ही मुलांनी अंधारात दिव्याखाली अभ्यास केला. मात्र, कोणालाही दया आली नाही.
माणुसकीचा विचार करून लाईन ओढण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. प्रत्येकाला घर, वीज, पाणी आणि अन्न मिळणे हा अधिकार आहे. त्यामुळे तहसीलदार आणि वीज कार्यालयाने संजय खांबल यांना वीज देणे बंधनकारक आहे. जर कोणी विरोध करत असेल, तर त्याला कायदेशीर मार्गांनी हाताळणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
विरोधकांची समजूत काढणे आवश्यक होते
माझ्या या विषयाबाबत तोडगा काढण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर तहसीलदार साहेबांकडे लेखी तक्रार आणि ग्रामपंचायतीकडे मागणी केली. मात्र, काहीच झाले नाही. विरोधकांनी विरोध केला. कोणीही दखल घेतली नाही. माझ्याकडे पैसे नसल्याने गरिबांना न्याय नसतो, हे मला समजून चुकले. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अशा बिकट अवस्थेत माझे कुटुंब आहे. सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे हुंबरठे झिजवले. मात्र, काही उपयोग झाला नाही. तहसीलदार साहेबांची खरी जबाबदारी होती. त्यांनी विरोधकांची समजूत काढणे आवश्यक होते. त्यांनी प्रयत्न केले असते, तर हा वाद मिटला असता. ज्यांनी विरोध केला, त्यांच्या घरात वीज आहे. त्यांनाही कोणीतरी जमीन मालकाने परवानगी दिली असेल. जर त्यांना त्यावेळी असा विरोध झाला असता तर वीज कशी मिळाली असती ? या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.
- संजय खांबल, कसई दोडामार्ग
नगरपंचायतीचा दर्जा मिळून काय उपयोग ?
कसई दोडामार्ग गावाला आता नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे. असे असताना या गावात तेरा वर्षे संजय खांबल यांच्या घरात अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वीज जोडणी मिळाली नाही, हे दुर्दैव आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृतरित्या बांधलेल्या धनदांडग्यांना वीज, पाणी देण्यात येते. मात्र, संजय खांबल हे गरीब असल्याने त्यांच्या घरात अंधार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.