राज्य लोकसेवा परीक्षेसाठी १३ हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:02+5:302021-03-20T04:22:02+5:30
कोल्हापूर : उद्या, रविवारी होणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी जिल्ह्यातील ४१ केेंद्रे ...
कोल्हापूर : उद्या, रविवारी होणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी जिल्ह्यातील ४१ केेंद्रे ठरवण्यात आली आहेत. या परीक्षेला १३ हजार ४८८ विद्यार्थी बसणार असून केंद्रांवर ९१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून रविवारी दोन सत्रात ही परीक्षा घेतली जाणार आहे.
कोरोनामुळे सातत्याने पुढे ढकलली गेलेली ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने अखेर रविवारी घेण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आस्थापनेकडून तयारी करण्यात आली आहे. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून नऊ तहसीलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय दोन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. दोन्ही सत्रांतील सॅनिटायझेशनची सोय करण्यात आली आहे.
सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझेशन, उमेदवारांचे थर्मल स्क्रीनिंग या कोरोनाबाबतच्या नियमावलींचे पालन करण्यात येणार आहे. यासह क्राऊड मॅनेजर नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून गर्दीचे व्यवस्थापन केले जाईल, तर नियुक्त कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
--
अशी होईल परीक्षा...
वार : रविवार (२१ मार्च)
विद्यार्थी : १३ हजार ४८८
जिल्ह्यातील केंद्रे : ४८
परीक्षेच्या वेळा : सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५