शाहूवाडीत शिक्षकांची १३२ पदे रिक्त--विद्यार्थ्यांचे भवितव्य रामभरोसेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:10 PM2017-09-01T23:10:00+5:302017-09-01T23:11:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर/ शित्तूर-वारूण : शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश शाळेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थी वर्गात, तर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी पुरेशे शिक्षक नाहीत. तर शिक्षण खात्याचे प्रमुखपदही प्रभारीवरच आहे. सध्या सर्वांत जास्त शिक्षकांची रिक्त पदसंख्या ही शाहूवाडीतच आहे. यात अध्यापक व पदवीधर अशी मिळून १३२ रिक्तपदे आहेत. तर जिल्ह्यातील उर्वरित अकरा तालुक्यांत एकूण रिक्तपदांची संख्या ही २९१ इतकी आहे. यावरूनच शाहूवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य रामभरोसेच असल्याची चर्चा पालकांमधून व्यक्त होत आहे.
बहुतांश शाळेत कमी शिक्षकांवरच शाहूवाडी तालुक्याचा शिक्षणाचा भार पडत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त झाले आहेत. मुळातच दुर्गम आणि वाड्या-वस्त्यांवर विखुरलेल्या तालुक्यातील भावी पिढीला शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे का? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
शासनाने अवलंबिलेल्या सुगम-दुर्गम नियमाचा फटका सर्वांत जास्त शाहूवाडीलाच बसला असून, त्याची झळ विद्यार्थी वर्गाला बसत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने या तालुक्यावर अन्याय केल्याची चर्चाही पुढे येत आहे. सुगम-दुर्गम बदली धोरण राबविताना सर्व तालुक्यांना समान जागा वाटप करण्यासोबतच प्रथम दुर्गम शाळांना प्राधान्य देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चर्चेअंती घेतल्याची माहिती पंचायत समिती सभापती डॉ. स्नेहा जाधव व उपसभापती दिलीप पाटील यांनी दिली. मात्र, बदली धोरण राबविताना शाहूवाडी तालुक्यावर अन्याय झाला असल्याचे मतही पदाधिकाºयांनी व्यक्त केले. गुरुजींच्या बदलीत नेते मंडळींची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली असल्याचा मुद्दाही सभापती, उपसभापती यांनी पुढे केला आहे. त्यामुळे सीईओंचा निर्णयही बाजूला ठेवण्यात आला आहे.
आजमितीला जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील रिक्तपदांची संख्या ही २९१ इतकी आहे. तर फक्तशाहूवाडी तालुक्यात अध्यापकाची ९२ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाहूवाडी तालुक्याच्या शिक्षण विभागाचे प्रमुख पद असलेले गटशिक्षण अधिकारी पद हे आजअखेर प्रभारीच असल्याने शाहूवाडीचा शैक्षणिक प्रवास सुसाट कधी होणार? नवीन नेमणूक होऊन एक महिना झाला तरीही गटशिक्षण अधिकारी पद हे प्रभारीच आहे. या कमी आणि रिक्तपदांची भरती येणारे समायोजन करते वेळी करावे, अन्यथा पंचायत समिती सभागृहाच्यावतीने उपोषण करण्यात येईल, असा इशाराही सभापती व उपसभापती यांनी दिला आहे. तर यापुढे रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून बदली होणाºया कोणत्याही संवर्गातील शिक्षकांना सोडले जाणार नाही.
सद्य:स्थितीत असणाºया शिक्षकांना एकाच वेळी अनेक वर्गांवर अध्यापन करावे लागत आहे. त्यातच अन्य कार्यालयीन कामाचाही ताण पडत असल्याने उपलब्ध शिक्षकांना ही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकूणच अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी देखील
शाहूवाडी तालुक्यात पुरेशे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठेशैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र, या बाबीकडे गंभीरपणे लक्ष देऊन शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
गुणवत्तावाढीसाठी विशेष मोहीम
शाहूवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष करून सेमी इंग्रजी अभ्यासक्रम राबविण्यासाठी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील यांनी स्वत: याकडे विशेष लक्ष दिले आहे. तर शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील शाळांची गुणवत्ता वाढीसाठी सभापती डॉ. स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. मात्र, आजमितीला शाहूवाडी तालुक्यात शिक्षकांची संख्या पाहिली असता या मोहिमेला गती मिळेल का?
शाहूवाडी तालुक्यातील शिक्षण
विभागाला शिक्षकांची कमतरता आहेच. मात्र, अधिकारी वर्गाचीही कमतरत
भासत आहे. मंजूर पदांची संख्या,
कार्यरत संख्या व रिक्त पद संख्या खालील प्रमाणे :
विस्तार अधिकारी ६ मंजूर पैकी ४ रिक्त
केंद्रप्रमुख २३ मंजूर पैकी १३ रिक्त
शिक्षक ६७९ मंजूर पैकी ९४ रिक्त
पदवीधर २0१ मंजूर पैकी ३८ रिक्त