‘सहा तासांत पुणे’साठी १३५ रुपये टोल!

By admin | Published: November 16, 2015 11:13 PM2015-11-16T23:13:07+5:302015-11-17T00:05:10+5:30

महामार्गापेक्षा पायवाट बरी : सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्ता खड्ड्यात; विकतच्या दुखण्यामुळे प्रवासी-वाहनधारक संतप्त--हाय काय... ‘न्हाय’ काय?

135 hours toll for Pune in six hours! | ‘सहा तासांत पुणे’साठी १३५ रुपये टोल!

‘सहा तासांत पुणे’साठी १३५ रुपये टोल!

Next

महेंद्र गायकवाड -- पाचवड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कमी वेळेत अन् सुखाचा प्रवास होत असतानाच महामार्ग प्राधिकरणाने (न्हाय) सहापदरीकरणाचा घाट घातला अन् महामार्ग अक्षरश: खड्ड्यात गेला. लिंब फाटा ते वेळेदरम्यान सध्या तब्बल आठ उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. ठिकठिकाणी वाहतूक वळविली असल्याने खड्ड्यातून मार्ग काढताना असल्या महामार्गापेक्षा गावाकडची पायवाट बरी असे म्हणण्याची वेळ येत आहे. सातारा ते पुणे या सहा तासांच्या प्रवासासाठी १३५ रुपये टोलही भरावा लागतोय. हे विकतचं दुखणं कशासाठी सहन करायचं? हा संतप्त सवाल आहे प्रवासी व वाहनधारकाचा. रविवारी झालेला मेगाब्लॉक हा ‘न्हाय’च्या गचाळ कामाचे फलित असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम आॅगस्ट महिन्यापासून वेगाने सुरू झाले. परंतु ठेकेदारांनी सहापदरीकरण कामाचे योग्य नियोजन न करता उड्डाणपुलांची कामे हाती घेतल्याने सर्वच कामे अपूर्णावस्थेत आहेत. लिंंब फाटा ते वेळे दरम्यानच सुमारे आठ उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यामध्ये अनुक्रमे लिंंब फाटा, आनेवाडी, उडतारे, पाचवड, भुर्इंज, जोशी विहीर, बोपेगाव आणि सुरूर या मोठ्या रहदारी असलेल्या गावांचा समावेश होतो. ही आठही ठिकाणे महामार्गावरील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाची असून येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर प्रवाशांची रहदारी सुरू असते. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत यापैकी एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसून त्याठिकाणची वाहतूक सुरळीत झालेली दिसून येत नाही. (क्रमश:)

मेगाब्लॉकने प्रवाशांना अक्षरश: रडविले
गावाकडे दिवाळीच्या सुटीचा आनंद घेऊन पुणे-मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना रविवारी महामार्गावर झालेल्या मेगाब्लॉकने अक्षरश: रडविले. लिंबखिंड ते पाचवड या दहा किलोमीटर अंतरात वाहतूक जाम झाली. वाहतूक सुरळीत व्हायला पहाट झाली. तोपर्यंत लहान मुले, वृद्धांसह सर्वच प्रवासी, वाहनचालकांचे मोठे हाल झाले. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘न्हाय’वर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.

कारणाविना झाली वाहतूक कोंडी
रविवारी महामार्गावर झालेला मेगाब्लॉक हा महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठेपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. महामार्गावर अशी कोणतीच घटना घडली नव्हती की ज्यामुळे एवढी मोठी वाहतूक कोंडी होईल. निव्वळ ‘न्हाय’ने सुरु केलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे ही समस्या उद्भवली आणि त्याचा त्रास हजारो प्रवाशांना सहन करावा लागला. राष्ट्रीय महामार्ग तयार करून अच्छे दिन आणणाऱ्या राज्य सरकारचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.


पाचवडमध्ये दुसऱ्या दिवशीही
वाहतूक
कोंडी

पाचवड : राष्ट्रीय महामार्गावरील शनिवारपासून विस्कटलेली वाहतूक आजपर्यंत काही सुरळीत झालेली नाही. पाचवड ते उडतारेपर्यंत आजही (दि. १६) दुपारनंतर वाहतुकीचा फज्जा उडाला. महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या नियोजनाअभावी व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तीन दिवसांपासून प्रवासी व जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहनांच्या मोठ्या लांबलचक रांगा लागल्या असून मोठ्या दुर्घटनेला जणू काही निमंत्रणच दिल्यासारखी स्थिती पाचवड फाटा ते उडतारे पर्यंतच्या परिसरात निर्माण झालेली आहे.

‘न्हाय’चा असाही ‘अर्धवट’पणा

सहापदरीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला सुरूर येथील उड्डाणपुलाचे काम ठेकेदारांनी सुरू केले. हे काम अजूनही अपूर्ण आहे. कहर म्हणजे हा अर्धवट उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला असून पुलाच्या एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहने ये-जा करतात. ‘न्हाय’चा हा ‘अर्धवट’पणा प्रवाशांच्या जिवावर बेतत असून आजपर्यंत याठिकाणी छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही झालेल्या आहेत.

Web Title: 135 hours toll for Pune in six hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.