शहरातील १३९ सीसीटीव्ही कॅमेरे पडले बंद; वादळी वाऱ्याचा परिणाम : देखभाल दुरुस्तीचे बिल दोन वर्षे थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:22+5:302021-05-22T04:22:22+5:30
कोल्हापूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेबरोबर कायदा व सुव्यवस्थेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांवर सरकारी अनास्थेची झापड आली आहे. त्याच्या ...
कोल्हापूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेबरोबर कायदा व सुव्यवस्थेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांवर सरकारी अनास्थेची झापड आली आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीचे बिल संबंधित कंपनीला दिले नसल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात १३९ कॅमेरे बंद पडले असून अद्याप ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस दंडाच्या माध्यमातून पैसे वसूल करतात तर त्यांनी त्याची देखभाल दुरुस्ती करावी, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
कॅमेरे दुरुस्तीबाबत पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले. महापालिकेच्या म्हणण्यानुसार ३१ मार्च २०२१ ला देखभाल, दुरुस्तीचा करार संपुष्टात आला आहे. पोलीस प्रशासन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून दंडाच्या माध्यमातून वर्षाकाठी ५६ लाख मिळवते तर त्याची देखभाल, दुरुस्ती पोलीस प्रशासनाकडूनच केली जावी. त्यावर महापालिकेने तसे लेखी कळवावे, असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.
शहराची सुरक्षितता, वाहतुकीची कोंडी व कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात सेफ सिटीअंतर्गत ६५ ठिकाणी १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ह्याची देखभाल दुरुस्ती महापालिका तर नियंत्रण पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होते. शहरातील प्रमुख बाजारपेठांत, ऐतिहासिक वास्तू, चौक, धार्मिक स्थळावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील गुंडगिरी, मारामारी, चेन स्नॅचिंग, शाळा आणि कॉलेज परिसरातील घटनांवर त्यातून वॉच राहतो. यासाठी सुमारे ७ कोटींहून अधिक खर्च केला आहे.
गेल्या आठवड्यात वादळी पावसामुळे या कॅमेऱ्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. १६५ पैकी १३९ कॅमेरे बंद असून त्याच्या देखभाल, दुरुस्तीचे बिल दोन वर्ष थकीत आहे. बिल मिळाले नसल्याने संबंधित कंपनीने देखभाल दुरुस्ती केलेली नाही.
दृष्टीक्षेपात सेफ सिटी प्रकल्प
एकूण ठिकाणे : ६५
एकूण कॅमेरे : १६५
बंद पडलेले कॅमेरे : १३९
एकूण झालेला खर्च : ७ कोटींहून अधिक
देखभाल दुरुस्ती : कुणी करायची यावरून महापालिका व पोलीस प्रशासनाचे एकमेकांकडे बोट
फोटो : २१०५२०२१-कोल-सीसीटीव्ही
कोल्हापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे वादळी वाऱ्याने बंद पडले असून त्याची दुरुस्ती कुणी करायची असा नवा वाद आता महापालिका व पोलीस प्रशासनामध्ये सुरू झाला आहे.