कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी १३९१ उमेदवार अपात्र, आता लेखी परीक्षेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 04:46 PM2024-06-29T16:46:33+5:302024-06-29T16:47:02+5:30

अचूकता आणि पारदर्शकतेसाठी यंदा प्रथमच भरती प्रक्रियेत अत्याधुनिक साधनांचा वापर

1391 candidates ineligible for police recruitment in Kolhapur, now preparation for written exam | कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी १३९१ उमेदवार अपात्र, आता लेखी परीक्षेची तयारी

कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी १३९१ उमेदवार अपात्र, आता लेखी परीक्षेची तयारी

कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलाकडील रिक्त असलेल्या २१३ जागांसाठी १९ जूनपासून पोलिस परेड मैदानावर भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सुरू होती. शुक्रवारी (दि. २८) दुपारी मैदानी चाचणी पूर्ण झाली. दहा दिवसांत राज्यभरातून ७६०६ उमेदवारांनी हजेरी लावली. मात्र, कागदपत्र पडताळणी आणि उंची, छाती मोजमापात १३९१ उमेदवार अपात्र ठरले. ६२२५ उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली. उमेदवारांना आता लेखी परीक्षेचे वेध लागले असून, लवकरच परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.

जिल्ह्यात पोलिस शिपाई पदाच्या १५४ जागांसाठी ६७७७ अर्ज आले. पोलिस शिपाई चालक पदाच्या ५९ जागांसाठी ४६६८ अर्ज आले. एकूण ११४४५ अर्जांपैकी १० हजार ८६५ उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी पोलिस प्रशासनाने बोलावले. त्यापैकी ७६०६ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले. त्यातील १३९१ उमेदवार कागदपत्र पडताळणी आणि उंची, छाती मोजमापात अपात्र ठरले. उर्वरित ६२२५ उमेदवारांची मैदानी चाचणी गेल्या दहा दिवसांत पूर्ण झाली.

रोज पहाटे पाचपासून पोलिस परेड मैदानावर चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाली. पावसाळी वातावरणातही पोलिस प्रशासनाने अतिशय नेटके नियोजन करून मैदानी चाचणी पूर्ण केली. राज्यात अन्य ठिकाणी मैदानी चाचणीसाठी हजर राहिलेल्या उमेदवारांना शुक्रवारी अखेरची संधी दिली होती. अखेरच्या दिवशी ५३ उमेदवारांनी हजेरी लावली, त्यापैकी ४४ उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली. पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये उमेदवारांची राहण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांची सोय झाली.

अत्याधुनिक साधनांचा वापर

अचूकता आणि पारदर्शकतेसाठी यंदा प्रथमच भरती प्रक्रियेत अत्याधुनिक साधनांचा वापर झाला. त्यामुळे उमेदवारांना तक्रारी करण्याची संधीच मिळाली नाही. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह ५० अधिकारी आणि अडीचशे कर्मचारी रोज भरतीप्रक्रियेसाठी परिश्रम घेतले. प्रक्रियेत सहभागी झालेले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधीक्षक पंडित यांनी प्रमाणपत्र दिले.

लवकरच लेखी परीक्षा

राज्यात अजून काही जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी सुरू आहे. सर्व जिल्ह्यांतील मैदानी चाचणी संपल्यानंतर राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून लवकरच लेखी परीक्षेची तारीख जाहीर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

७६०६ उमेदवारांची हजेरी

हजर उमेदवार - चाचणी दिलेले उमेदवार - अपात्र उमेदवार
७६०६ - ६२२५ - १३९१
 

Web Title: 1391 candidates ineligible for police recruitment in Kolhapur, now preparation for written exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.