Kolhapur: रुईतील सचिन कांबळे मूत्यूप्रकरणी १४ जण अटकेत, आरोपीच्या ओळख परेडवेळी पोलिस गाडीवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 05:31 PM2024-08-19T17:31:02+5:302024-08-19T17:31:20+5:30
गावात तणाव, गावाला पोलिस छावणीचे स्वरूप
हातकणंगले : रुई (ता. हातकणंगले) येथील सचिन कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी १४ आरोपींना पोलिसांनी अटक करून इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना दि. २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीच्या ओळख परेडसाठी गेलेल्या पोलिस गाडीवर आंबेडकरनगर येथे जमावाने दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
रुई येथील दोन समाजामध्ये शुक्रवारी रात्री वाद मिटविण्याच्या बैठकी मध्येच वादावादी होऊन दोन समाजांचे युवक एकमेकांसमोर भिडल्याने झालेल्या हाणामारीमध्ये सचिन कांबळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात १६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी यातील नंदकुमार बळी साठे (वय ५३) जितेंद्र चिंतू यादव (वय ३८), अशोक विश्वास आदमाने (वय ४१), अनोष जितेंद्र साठे (वय १९) , नीलेश अनिल ऊर्फ आनंदा साठे (वय २९) , दिलीप गुंडा साठे (वय ३०), प्रथमेश उर्फ राज आनंदा साठे (वय २३), सचिन विलास शिंदे, (वय ३८), सौरभ दगडू भिंगारे (वय २६), जयदीप अनिल ऊर्फ आनंदा साठे (वय २५), अनिल विठ्ठल साठे (वय ३८), प्रेम संजय साठे (वय २३), तुषार इस्वाईल साठे, (वय २३), आदर्श इस्त्राईल साठे (वय २५) या चौदा आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप फरारी आहेत.
आरोपीना ओळख परेडसाठी पोलिस गाडीतून गावामध्ये नेले असता आंबेडकरनगर येथे आरोपी असलेल्या गाडीवर जमावाने दगडफेक करून पोलिस गाडीच्या काचा फोडल्याने गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जादा कुमक मागविल्यामुळे गावाला पोलिस छावणीचे रूप आले आहे.