१४ मृतदेह सापडले कित्येक मैलांवर

By admin | Published: August 5, 2016 01:26 AM2016-08-05T01:26:04+5:302016-08-05T01:59:19+5:30

सावित्री पूल दुर्घटना : दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरूच

14 bodies found on several miles | १४ मृतदेह सापडले कित्येक मैलांवर

१४ मृतदेह सापडले कित्येक मैलांवर

Next

जयंत धुळप/संदीप जाधव -- महाड मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील
पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १४ मृतदेह गुरुवारी घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर सापडले. यावरून नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्तीही कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पुलासह नदीपात्रात पडलेल्या तवेरा जीपमधील रंजना वझे यांचा मृतदेह घटनास्थळापासून एक कि.मी. अंतरावर महाड शहराजवळ केंबुर्ली नदी किनाऱ्यावर एका शेतात आढळला, तर याच गाडीतील शेवंती मिरगल यांचा मृतदेह त्याहून खूप पुढे ८० कि. मी. अंतरावर हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर सापडला. जयगड-मुंबई एसटी बसचे चालक
श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह ९० कि.मी. अंतरावर दापोली तालुक्यातील आंजर्ले किनारी, तर आवेद अल्ताफ चौगुले या राजापूर-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांचा मृतदेह दादली पुलाजवळ, पांडुरंग घाग राजापूर यांचा केंबुर्लीजवळ, प्रशांत माने यांचा मृतदेह ३५ कि.मी अंतरावर म्हसळा तालुक्यातील तोराडी बंडवाडी खाडी किनारी सापडला.
स्नेहा बैकर यांचा मृतदेहदेखील दोन कि.मी.वरील राजेवाडी नदी किनारी आढळून आला. याशिवाय सुनील बैकर, नेहा सुनील बैकर, रमेश कदम, प्रभाकर शिर्के, मंगेश कातर, संतोष बलेकर यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.
सर्व मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी आणण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. इतर बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा तपास लागत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले. एखादा मृतदेह सापडल्याचे वृत्त मदत केंद्रात समजताच उपस्थित असलेल्या नातेवाइकांमध्ये घबराट निर्माण होत होती. आपल्याच नातेवाइकांचा हा मृतदेह असावा या आशेने दोन दिवस तळ ठोकून बसलेले हे सर्व नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात धाव घेत होते. मृताची ओळख पटल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर होताना दिसून येत होते.


इतरांचा शोध सुरूच
सागरी तटरक्षक दल, एनडीआरएफ, नौदल, आदी यंत्रणांनी बुधवारी पहाटेपासून सुरू केलेले शोधकार्य गुरुवारी दुसऱ्या दिवशीदेखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले.
तीनशे किलो वजनाचे लोहचुंबक पाण्यात सोडून क्रेनच्या सहाय्याने वाहनांचा नदीत शोध घेण्याचे एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र सायं. पाच वाजेपर्यंत तरी या बेपत्ता वाहनांचा शोध घेण्यात अपयश आले. नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे देखील शोधमोहीम सुरूच होती.
ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी संपूर्ण दगडी कातळ असल्याने दुर्घटनेच्या ठिकाणी वाहने न सापडता ती पुढे वाहून गेली असावी, अशी शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.


जोरदार प्रवाहामुळे अडचणी
सुसज्ज यंत्रणा असूनही पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे तसेच जोरदार प्रवाहामुळे नदीत बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे एनडीआरएफचे निरीक्षक महमद शफिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डेप्युटी कमांडर पंडित इथापे यांच्या नेतृत्वाखाली १०३ जवान मदतकार्य करीत असल्याचे शफिक यांनी सांगितले. घटनास्थळापासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील पादली पुलापर्यंतच्या प्रवाहात बोटिंग डिप डायव्हर्स आॅक्सिजनयुक्त यंत्रणेद्वारे शोधकार्य सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेची पाण्याखाली शोध घेऊ शकणारी यंत्रेही शोधमोहिमेत वापरण्यात येत आहेत.

Web Title: 14 bodies found on several miles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.