Kolhapur: गुप्तधन प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:19 PM2024-07-05T14:19:41+5:302024-07-05T14:20:31+5:30
कौलव येथील अघोरी प्रकार : कळंबा कारागृहात रवानगी
भोगावती : कौलव (ता.राधानगरी) येथील गुप्तधनाच्या आमिषाने अघोरी प्रकार करणाऱ्या मुख्य संशयित आरोपी शरद मानेसह पाचजणांना राधानगरी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात सहभागी सर्व संशयिताना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती राधानगरी पोलिस ठाण्याचे फौजदार संतोष गोरे यांनी दिली.
मंगळवारी रात्री कौलव येथे गुप्तधनाच्या हव्यासापोटी अघोरी कृत्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सहाजणांना कौलवचे सरपंच आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ पकडण्यास यश आले होते. शरद धर्मा माने याने महेश सदाशिव काशिद (मांत्रिक), अशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ, संतोष निवृत्त लोहार, कृष्णात बापू पाटील या संशयित आरोपींच्या मदतीने राहत्या घरात मोठा खड्डा काढून गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न चालवला होता.
हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्यांना मंगळवारी मध्य रात्री राधानगरी पोलिसांनी अटक करण्यात येऊन सहाजणांवर गुन्हा नोंद केला होता. गुरुवारी त्यांना न्यायालयात उभा केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती फौजदार गोरे यांनी दिली.