आजरा वीज वितरणच्या १० कर्मचाऱ्यांचे १४ तास काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:28+5:302021-05-28T04:19:28+5:30

वादळी वाऱ्यासह पावसाने सर्वत्र चिखल, फोनची सेवा बंद, खांब उचलून न्यायचे, ते उभे करायचे, तार ओढायची, फॉल्ट आला तर ...

14 hours work of 10 employees of Ajra power distribution | आजरा वीज वितरणच्या १० कर्मचाऱ्यांचे १४ तास काम

आजरा वीज वितरणच्या १० कर्मचाऱ्यांचे १४ तास काम

googlenewsNext

वादळी वाऱ्यासह पावसाने सर्वत्र चिखल, फोनची सेवा बंद, खांब उचलून न्यायचे, ते उभे करायचे, तार ओढायची, फॉल्ट आला तर आपलीच माणसे शोधायची, चार ग्राहकांसाठी पाच किलोमीटरची पायपीट करायची, असा सहा दिवस दिनक्रम सुरू होता. अखेर कणकवलीतील (कोकण) आचरा-मिठबाव विभागात विद्युत पुरवठा सुरळीत केला. कष्ट व जिद्दीच्या जोरावर आजऱ्यातील वीज वितरणचे सहायक अभियंत्यासह १० कर्मचाऱ्यांनी १२ ते १४ तास काम केले. अखेर घाटी माणसांनीच कोकणला उजेडात आणलं.

तौक्ते चक्रीवादळाने कोकणातील मिठबाव शाखा कार्यालयांतर्गत आचरा विभागातील २० खांब एच.टी. व ८० खांब एल.टी. लाईनचे पडले होते. जागोजागी कंडक्टर तुटून पडले होते. सर्वत्र अंधार होता. वादळी वाऱ्याने विजेच्या तारांवर झाडे पडली होती.

विजेचा खांब उन्मळून पडले होते. डी. पी. बंद पडल्या होत्या. वीज नसल्यामुळे पाणी नाही. त्यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अखेर आजरयातील वीज वितरणचे कर्मचारी कोकणच्या मदतीला धावून गेले. रात्रंदिवस काम करून अवघ्या सहा दिवसात आचरा विभाग उजेडात आणला.

वादळी वाऱ्यासह पावसाने चिखल झाल्यामुळे डांब घेऊन जाताना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागायचे. तारा ओढताना तर शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागला. त्यातच मोबाईल सेवा बंद असल्याने कोणाशी संपर्क होत नव्हता. चार-पाच ग्राहकांसाठी ५ किलोमीटरची पायपीट करून फॉल्ट शोधायचा, खांब उभे करायचे, तारा ओढायच्या, विद्युत पुरवठा सुरू करायचा. मात्र फॉल्ट आला तर आपल्याच माणसांना शोधावे लागायचे. त्यासाठीही पायपीट ठरलेली असायची.

चहा व जेवणापेक्षा त्या ठिकाणच्या लोकांना लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करून देणे हे एकच ध्येय होते. त्यामुळे १२ ते १४ तास काम करून अवघ्या सहा दिवसांत आचरा - मिठबाव विभाग उजेडात आणला.

सहायक अभियंता निखिल मोगरे, वायरमन प्रकाश पोटे, राजेसो शेख, सुनील पाटील, संतोष पुजारी, ज्ञानेश्वर जाधव, सुनील भाटले, तेजस पाटील, सहदेव बामणे, चालक भिकाजी हुले या घाटी माणसांनीच प्रामाणिकपणे काम केल्यामुळे कोकण लवकर उजेडात आला. कणकवलीचे कार्यकारी अभियंता बी. टी. मोहिते यांनी अधिकारी व वायरमन यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत सत्कार केला.

------------------------

* वायरमननी जंगलातून शोधल्या पायवाटा

प्रचंड जंगल, पाऊस व चिखलामुळे खांब पडलेल्या ठिकाणी जाणेही अडचणीचे होते. वायरमनची एक टीम हातात कोयता घेऊन झाडांच्या फांद्या तोडत जंगलातूनच पाय वाटा शोधत पुढे जायचे. आणि दुसरी टीम विजेचे खांब खांद्यावरून घेऊन जाऊन उभे करायचे, तिसरी टीम तारा ओढायची मग विद्युत पुरवठा सुरू करायचा. फॉल्ट असला, वीज सुरु झाली नाहीतर पायपीट करावी लागायची, पण थांबलो नाही जिद्दीने विद्युतपुरवठा सुरळीत केला

- निखिल मोगरे - सहायक अभियंता आजरा..

--------------------------

फोटो ओळी : आजरा वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी कणकवलीचे कार्यकारी अभियंता बी.टी. मोहिते. दुसऱ्या छायाचित्रात मिछबाव-आचरा येथे अंधारया रात्रीही आजरा वीज वितरणचा वायरमन खांबावर चढून काम करताना.

क्रमांक : २७०५२०२१-गड-०३/०४

Web Title: 14 hours work of 10 employees of Ajra power distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.