जागतिक दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:05 PM2024-09-21T16:05:45+5:302024-09-21T16:06:16+5:30
कोल्हापूर : जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची सन २०२४ साठीची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली. यात शिवाजी ...
कोल्हापूर : जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची सन २०२४ साठीची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली. यात शिवाजी विद्यापीठाच्या १४ संशोधकांनी स्थान प्राप्त केले.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत विद्यापीठाचे प्र-कुलगुरु तथा ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान) यांच्यासह निवृत्त प्रा. ए. व्ही. राव (पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. सी. एच. भोसले (पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. एस. पी. गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ. ए. व्ही. मोहोळकर (पदार्थविज्ञान), डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), प्रा. के. एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. टी. डी. डोंगळे (नॅनोसायन्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनोसायन्स), डॉ. हेमराज यादव (रसायनशास्त्र) आणि संलग्नित महाविद्यालयांतील संशोधक डॉ. व्ही. एल. पाटील (पदार्थविज्ञान) व डॉ. एस. ए. व्हनाळकर (पदार्थविज्ञान) यांचा समावेश आहे. या संशोधकांचा विद्यापीठ कार्यालयात कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथभेट व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
स्टॅनफोर्डचे रँकिंग
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने शोधनिबंधाला मिळणारी सायटेशन्स, एच निर्देशांक, सहलेखकत्व, संशोधन लेखकाची नेमकी भूमिका या घटकांचा सारासार विचार करून क्रमवारी प्रसिद्ध केली. या यादीसाठी १९६० ते २०२४ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणाऱ्या संशोधकांची सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर निवड करण्यात आली.