बालविवाहातून १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती, पतीस अटक; आरोग्य अधिकाऱ्यामुळे समोर आली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:04 PM2022-09-06T12:04:18+5:302022-09-06T12:04:46+5:30
मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याने इस्पूर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नाव नोंदविण्यासाठी आली होती. तेंव्हा तेथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब समजली.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून काही अंतरावरच असलेल्या गावात (ता. करवीर) येथे बालविवाहातून १४ वर्षांची मुलगी गर्भवती असल्याचे अवनि संस्था जागर प्रकल्प व बाल संरक्षण समितीला आढळले आहे. रविवारी मुलीच्या २० वर्षीय नवऱ्याला इस्पूर्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. मुलीला बालसंरक्षणगृहात दाखल केले आहे.
मुलगा व मुलगी दोघांचीही कौटुंबिक स्थिती बिकट आहे. त्यांचा विवाह जुलै २०२१ रोजी झाला. मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याने इस्पूर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नाव नोंदविण्यासाठी आली होती. तेंव्हा तेथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब समजली. त्यांनी ग्रामसेवकांना याबाबतचे पत्र पाठवले. ग्रामसेवकांनी ग्राम बाल संरक्षण समितीसमोर विषय ठेवला. त्यांनी अवनि जागर प्रकल्पाला मदत मागितली. त्यांनी पोलिसांना व बालकल्याण समितीला कळवून मुलीला बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. समितीने ग्रामसेवक यांना बाल विवाह कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रविवारी इस्पूर्ली पोलिसांनी नवऱ्याला ताब्यात घेतले.
यासाठी इस्पूर्ली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, अवनिच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व बालकल्याण समिती अध्यक्ष व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. जागरचे प्रमोद पाटील, ग्रामसेवक पांडुरंग जगताप, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्णा मस्के, महिला पोलीस कॉन्स्टेबल बी. बी. धनगर व ग्राम बाल संरक्षण समितीने परिश्रम घेतले.