...अखेर १४ वर्षांनंतर कागलमध्ये निघाला मोर्चा
By admin | Published: January 4, 2015 10:26 PM2015-01-04T22:26:27+5:302015-01-05T00:37:59+5:30
राष्ट्रवादीचे आंदोलन : विरोधी पक्षाची भूमिका वटविण्यास सुरूवात
जहाँगीर शेख - कागल -- संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींची शासन यंत्रणेमार्फत सुरू असलेली चौकशी त्वरित बंद करावी. या मागणीसाठी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने म्हणजे मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून विरोधी पक्षाची भूमिका वटविण्यास सुरूवात केली.
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी किती पात्र आणि किती अपात्र हा विषय महत्त्वाचा असला तरी गेल्या १४ वर्षांनंतर तहसील कार्यालयावर तालुक्यातील एका राजकीय गटाचा असा भव्य मोर्चा या निमित्ताने निघाला.
आंदोलने कागलात नेहमीच होतात आणि ही आंदोलने शिवसेना, आरपीआय, डाव्या विचारसरणीच्या संघटनाच करतात. मात्र तालुक्यातील प्रमुख राजकीय गट यापासून चार हात लांब राहिल्याचेच चित्र गेली १४ वर्षे पहावयास मिळाले. याचे कारण स्पष्ट आहे. तालुक्यातील चारही गट या ना त्या माध्यमातून सत्तेशी जुळवून घेत राहिले. त्यासाठी पक्षांतरे केली. सत्ताधारी झाल्याने मोर्चे काढायचा कोणाच्या विरोधात हा प्रश्न तयार झाला. मुश्रीफ गट तर १४ वर्षे सत्तेत होता. आता विरोधी पक्षात असल्याने योजनेतील लाभार्थींची मते तर सर्वच राजकीय गटांना हवीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंनी पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचीच भाषा झाली. अपात्र की पात्र यावर चर्चाच झाली नाही. आताही होणारा विरोध पडद्याआडच आहे. चौकशी सुरू आहे शासनयंत्रणेमार्फत.
१४ वर्षांपूर्वी वंदूर येथील धनगर समाजाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्यावर तत्कालीन घाटगे गटाने माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.
पूर्वी विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिकांनी एकत्र येत काळम्मावाडी धरणासाठी आणि गैबी बोगद्याला विरोध करण्यासाठी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर आता हा मोर्चा निघाला.