जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यात यंदा १४०० कोटींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:59+5:302021-06-24T04:17:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्याच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १६ हजार ४० कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्याच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १६ हजार ४० कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा १४०० कोटींची वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांना बँकिंगखाली आणून त्यांच्या संलग्न सेवांसाठी सुमारे ४४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने यांनी पतपुरवठा आराखड्याची माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, आरसेटीच्या संचालिका सोनाली चतूर, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, तर दूरदृश्यप्रणालीव्दारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहा. महाप्रबंधक मनोज मून यांनी सहभाग घेतला.
अशी केली तरतूद -
शेतकरी संलग्न सेवांसाठी - ४४५० कोटी
कृषी क्षेत्रासाठी राखीव - २७२० कोटी
खरीप पीक कर्जासाठी - १३६० कोटी
रब्बी पीक कर्जासाठी - १३६० कोटी
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी- ४२४० कोटी
इतर प्राथमिक क्षेत्रासाठी - १५२० कोटी
प्रधानमंत्री जनधनची अंमलबजावणी करा
प्रधानमंत्री जनधन योजना अंमलबजावणी, पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणे, नाबार्डच्या विविध अनुदान योजना राबविणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी आरसेटीव्दारा युवक प्रशिक्षणासाठी सर्व बँकांना समाविष्ट करावे आणि एकूण कर्ज वाटपाच्या १५ टक्के इतकी रक्कम अल्पसंख्याकांना वाटप करण्यात यावी, असा सहाकलमी कार्यक्रम बँकांनी प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्हा पतपुरवठा आराखड्याची बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अग्रणी बँकेचे राहुल माने, डॉ. रवी शिवदास आदी उपस्थित होते. (फोटो-२३०६२०२१-कोल- बँक)