लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने ही महत्वपूर्ण भूमिका बजावली...१४५० मालवाहतूक रेल्वेने पोहोचले अत्यावश्यक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:51 PM2020-04-28T17:51:14+5:302020-04-28T18:29:56+5:30
संपूर्ण देशात आवश्यक वस्तूंचे लोडींग अनलोडिंग करणे या बाबीला प्राधान्य देण्याची भारतीय रेल्वेची नीती आहे, तिला अनुसरून पुणे रेल्वे मंडळ कार्य करत आहे. मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा यांनी सर्व हितधारकांना आश्वासन दिले आहे की सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लॉक डाऊन च्या वाढलेल्या काळात देखील रेल्वेची सेवा निरंतर चालू राहील.
कोल्हापूर : कोविड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन लागू झाल्याने देश जणू काही थांबला आहे. या लॉक डाऊन च्या कठीण काळात राष्ट्रीय ट्रान्सपोर्टर भारतीय रेल्वे पुणे, सातारा ,कोल्हापूर आणि देशाच्या इतर भागात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मालगाड्या चालवीत आहे. पुणे रेल्वे मंडळाने लॉक डाऊन च्या या काळात 1450 मालगाड्या अत्यंत कुशलता व गतीने चालवल्या आहेत.
मंडळावर 25 मार्च ते 26 एप्रिल पर्यंत 27 रेक म्हणजे 1 लाख टनांहून अधिक खाद्यान्नाची अनलोडिंग झाली. हे अनलोडिंग पुणे, बारामती, कोल्हापूर, मिरज व सातारा येथील माल गोदामात केले गेले जे खाद्य वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त मंडळाने या भागात एलपीजी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे 15 रेक एलपीजी अनलोडींग केले जे 15लाख सिलेंडर समकक्ष आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकार सोबत समन्वय ठेवून लॉक डाऊन च्या या काळात कृषी खत 21 रेक, सिमेंट 9 रेक, लोखंड व स्टीलचे 9 रेक व मीठ 1 रेक असे पुणे रेल्वे मंडळाच्या विविध टर्मिनल वर उतरवले आहे.
मंडळाच्या लोणी स्टेशन येथून पेट्रोलियम उत्पादनाचे 18 रेक (9लाख लिटर्स पेट्रोलियम उत्पादन) बंगलोर, मंगळूर, सोलापूर, नवलूर, जबलपूर, सागर या ठिकाणी पाठवले गेले. बारामती स्टेशन येथून 3500 टन साखर तामिळनाडूतील दिंडीगुल व जवळील क्षेत्रात पाठवली गेली. कोल्हापूर स्टेशन येथून साखरेचे 3 रेक निर्यातीसाठी पाठवले गेले. याच बरोबर कृषी खत ,पेट्रोलियम उत्पादन ,साखर ,सिमेंट आणि ड्राय ऑइल केक सारख्या अत्यावश्यक वस्तू उत्पादन , उत्तर क्षेत्रामधून दक्षिण क्षेत्रामध्ये खाद्यान्न वेळेवर पोहोचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत.
यासाठी स्टेशन मास्टर, पॉइंट्समन, गार्ड ,लोको पायलट ,कंट्रोलर इत्यादी कामगार वर्ग मालगाड्यांचे संचालन व रेल्वेची चाके सदैव गतीमान ठेवण्यासाठी 24 तास काम करीत आहेत . मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा यांनी सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लॉक डाऊन च्या वाढलेल्या काळात देखील रेल्वेची सेवा निरंतर चालू राहील असा विश्वास दिला असल्याचे रेल्वेचे पुणे विभगाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.