पाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हा बँकेकडे १५ कोटीच्या ठेवी - ए. बी. माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:49+5:302021-04-15T04:23:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल १५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल १५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. ठेव संकलनासाठी बँकेच्या सर्व म्हणजेच १९१ शाखा सुरूच ठेवल्या होत्या. चांगल्या व्याजदरामुळे बँकेच्या विविध ठेव योजनांमध्ये ठेवीदारांनी पैसे गुंतवल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिली.
बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँकेची नेत्रदीपक प्रगती केली आहे. मार्च २०२१ अखेर ७१२८ कोटीच्या ठेवी संकलित करत १४७ कोटीचा ढोबळ नफा मिळवला आहे. बँकेचा सी.आर.ए.आर. १२.२५ टक्के व निव्वळ एनपीए २.३८ टक्के आहे. बँकेचा संयुक्त व्यवसाय ११ हजार ७०० कोटी असून सर्व १९१ शाखा नफ्यात आहेत.
बँकेने चालू आर्थिक वर्षात दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात केली आहे. १ एप्रिलपासून शेती, साखर कारखाने, इतर संस्था व व्यक्तिगत कर्जावरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. त्याचबरोबर ठेवीचा व्याजदर मात्र स्थिर ठेवला आहे. शेतकऱ्यांना ० टक्के व्याज दराने पाच लाखापर्यंतचे पीक कर्ज देण्याचा निर्णय महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूर जिल्हा बँकेने घेतल्याचे डॉ. ए. बी. माने यांनी सांगितले.
चौकट-
शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण
बँकेकडून १००% कर्ज घेऊन बँकेकडे १००% कारखाना बिले वर्ग करणाऱ्या पीक कर्जदारास २% रिबेट मिळणार आहे. शेतकऱ्याचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यास विमा संरक्षण देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून लवकरच याबाबतची निविदा मागविणार असल्याची माहिती डॉ. माने यांनी दिली.