नादुरुस्त वजनकाट्यामुळे दीड कोटीचा कचरा घोटाळा : इचलकरंजी पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:44 PM2018-11-15T23:44:04+5:302018-11-15T23:45:22+5:30
आसरानगर येथे असलेल्या कचरा डेपोवरील नादुरुस्त वजनकाट्याचा फायदा उचलत अतिरिक्त वजनाचा कचरा दाखवून नगरपालिकेचे सुमारे १.५९ कोटी रुपयांचे नुकसान केले आहे.
इचलकरंजी : आसरानगर येथे असलेल्या कचरा डेपोवरील नादुरुस्त वजनकाट्याचा फायदा उचलत अतिरिक्त वजनाचा कचरा दाखवून नगरपालिकेचे सुमारे १.५९ कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. हा कचरा घोटाळा ४० टक्के कचरा अधिक दाखवून करण्यात आला असल्याचा आरोप राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे व कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी गुरुवारी केला. तसेच या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील कचरा जमा करणे व तो कचरा वाहतूक करून आसरानगर येथील कचरा डेपोवर टाकण्याचा मक्ता बीव्हीजी या कंपनीला देण्यात आला आहे. यासाठी प्रतिटन ७४० रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. सप्टेंबर २०१७ पासून बीव्हीजी कंपनी हा मक्ता चालवित आहे. मात्र, त्यावेळेपासून कचरा डेपोवर असलेला वजन काटा नादुरुस्त झाला आहे. परिणामी दररोज अंदाजे १४० टन कचरा आसरानगर येथील डेपोवर टाकण्यात येत असल्याचे गृहीत धरून बीव्हीजी कंपनीला प्रत्येक महिन्याला बिल अदा करण्यात येत आहे.
कचरा डेपोवरील वजन काटा नादुरुस्त असल्यामुळे खासगी वजनकाट्यावर कचºयाचे वजन करावे आणि दरम्यानच्या काळात नगरपालिकेने वजनकाटा दुरुस्त करावा, अशी मागणी जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये या दोन्ही नगरसेवकांनी केली होती. तरीसुद्धा वजनकाटा दुरुस्त करून घेण्यात आला नाही किंवा खासगी वजनकाट्यावर कचºयाचे वजन केले गेले नाही.
आता नोव्हेंबर २०१८ मध्ये कचरा डेपोवरील वजनकाटा दुरुस्त झाला असून, दैनंदिन कचºयाचे वजन केले जात आहे. सरासरी दररोज ८० टन इतका कचरा आसरानगर डेपोवर जमा होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये दररोज १४० टन गृहीत धरून बीव्हीजी कंपनीला दिलेली रक्कम ४० टक्क्यांनी अधिक होत आहे. म्हणजेच साधारणपणे १.५९ कोटी रुपयांचे नुकसान पालिकेला झाले असल्याचे चोपडे व बावचकर यांनी सांगितले.