Kolhapur: करवीर पंचायत पतसंस्थेतील अपहार १५ कोटीचा, ठेवीदारांची तक्रार; नोटिसा लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:15 PM2024-09-10T13:15:14+5:302024-09-10T13:15:58+5:30
एम. ए. देसाई यांचाही गैरव्यवहारात हात
कोल्हापूर : येथील करवीर पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत तब्बल १५ कोटी ४४ लाख ३३ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले असून, संस्थेने मानद सचिव एम. ए. देसाई व दिवंगत पी. ए. परीट यांच्या नातेवाइकांना नोटिसा लागू केल्याची माहिती सोमवारी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील यांना दिली. पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. सुमारे ६० हून अधिक ठेवीदारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पतसंस्थेतील गैरव्यवहारांचा पाढाच वाचला.
निवेदनात म्हटले आहे की, सचिव परीट यांचे १२ जानेवारी २०२४ ला निधन झाले. त्यांनी पाच कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. शासकीय लेखापरीक्षक नितीन चौगुले यांनी लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. त्यामध्ये १५ कोटी ४४ लाख ३३ हजार १७२ रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. संस्थेने तीन कोटी कर्ज वाटप केले असून, त्याव्यतिरिक्त कुठेही शिल्लक रक्कमा नाहीत. सभासद नसताना दिलेली कर्जे, ठेव पावती नसताना दिलेल्या रक्कमा, स्वत:च्या नावे वर्ग करून उचललेल्या रक्कमा निदर्शनास येऊनही संचालक तोंडावर पट्टी बांधून गप्प आहेत.
निवेदन देताना विश्वास साबळे, एच. डी. नाईक, शहाजी भोसले, वसंत कानकेकर, बी. एस. चौगले, एस. एम. सार्दळ, विलास गायकवाड, जयश्री तळेकर, सविता पाटील, कल्पना यादव, आदी ठेवीदार उपस्थित होते.
सचिव परीट यांची मालमत्ता..
- कुरुकली (ता. करवीर) येथे ७० मुऱ्हा म्हशींचा गोठा प्रकल्प
- गावांत दोन मुलांसाठी प्रत्येकी कोटींचे बंगले.
- रस्त्यालगतच वस्त्रालयाची भव्य इमारत
- ४ ते ५ गावांत मोक्याची जमीन. त्यातील काही जमिनी रस्त्याकडेला.
संचालकही सहभागी..
या गैरव्यवहारात काही संचालकही सहभागी असून, त्यांनीही प्रचंड अवैध संपत्ती जमा केल्याचे या निवेदनात म्हटले आहे. पतसंस्थेचे ९९ टक्के ठेवीदार निवृत असून, त्यांना औषधोपचार, मुलांची लग्ने, घरबांधणी यासाठी पैशाची गरज असताना हेलपाटे मारायची पाळी आली आहे.