शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा १५ दिवस पुढे ढकला, ‘सुटाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:05 PM2018-10-09T17:05:18+5:302018-10-09T17:06:54+5:30
बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा १५ दिवस पुढे ढकला, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी केली. विविध मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सुटाच्या नेतृत्वाखाली विद्यापीठावर धडक मोर्चा काढला.
कोल्हापूर : बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा १५ दिवस पुढे ढकला, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी केली. विविध मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सुटाच्या नेतृत्वाखाली विद्यापीठावर धडक मोर्चा काढला.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्सच्या (एम्फुक्टो) नेतृत्वाखाली राज्यभरातील प्राध्यापकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला चौदा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री आणि उच्चशिक्षणमंत्री अद्यापही आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचा निषेध करीत मंगळवारी सुटाच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी शिवाजी विद्यापीठावर मोर्चा काढला.
सकाळी साडेअकरा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहापासून मोर्चाला सुरूवात झाली. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन, डोक्यावर गांधी टोपी परिधान करून प्राध्यापक या मोर्चात सहभागी झाले.
‘उच्च शिक्षणाची गुणवत्ता, स्वायत्तता मोडीत काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत मौन बाळगणाऱ्या शिक्षणमंत्र्यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला.