सीमाप्रश्न, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात १५ दिवस बंदी आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 01:21 PM2022-12-09T13:21:18+5:302022-12-09T13:21:48+5:30
कोणतेही शस्त्र जवळ बाळगणे आणि पाच अगर पाचहून अधिक लोकांनी एकत्र येणे यावर बंदी
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तापलेले वातावरण, महाविकास आघाडीने उद्या दिलेला आंदोलनाचा इशारा आणि जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या सर्व बाबींचा विचार करून कोल्हापूर पोलिसांनी आज शुक्रवारपासून १५ दिवसांसाठी बंदी आदेश जारी केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबत आदेश काढण्यात आले आहेत.
कर्नाटकामध्ये कन्नड वेदिके संघटनेने वाहनांवर केलेला हल्ला, त्याच्या कोल्हापूरमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया, त्यामुळे स्थानिक कन्नड व्यावसायिक आणि रहिवासी यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता तसेच महाविकास आघाडीने शनिवारी जाहीर केलेले आंदोलन आणि त्यासाठी बेळगावहून एकीकरण समितीच्या नेत्यांना दिलेले निमंत्रण या सर्व बाबींचा विचार करून हा बंदी आदेश जारी करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आज शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून २३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा हा बंदी आदेश अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जारी केला आहे. त्यानुसार कोणतेही शस्त्र जवळ बाळगणे आणि पाच अगर पाचहून अधिक लोकांनी एकत्र येणे यावर बंदी आली आहे. साहजिकच आता महाविकास आघाडीलाही त्यांचे आंदोलन रद्द करावे लागणार आहे.