पंधरा रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघड ‘आरोग्य मित्र’ अडचणीत : सिटी, मोरया, संजीवनी, कृष्णा रुग्णालयांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:06 AM2018-10-16T01:06:55+5:302018-10-16T01:08:59+5:30
महात्मा फुले जनआरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर शहरासह जिहयातील एकूण १५ रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघड झाले आहे. सर्व उपचार मोफत करण्याची अट असताना रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या चार रुग्णालयांना या योजनेतून काढून टाकण्यात आले
कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर शहरासह जिहयातील एकूण १५ रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघड झाले आहे. सर्व उपचार मोफत करण्याची अट असताना रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या चार रुग्णालयांना या योजनेतून काढून टाकण्यात आले असून, उर्वरित ११ रुग्णालयांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. योजनेच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई आणि दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाºयांच्या १० पथकांनी शुक्रवारी (दि. १२) कोल्हापूर जिल्ह्यातील या योजनेत समाविष्ट ३४ रुग्णालयांवर छापे टाकले होते. त्यातील अनेक रुग्णालयांमध्ये २२रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणे, औषधाचे पैसे घेणे, इतर खर्च दाखवून त्यांचे बिल आकारणे यासारखे प्रकार घडल्याचे समोर आले. त्यानंतर शनिवारीही हे छापा टाकण्याचे काम सुरू होते. या छाप्यात काही रुग्णालयांमधील संगणक आणि कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती. रविवारी दिवसभरामध्ये या अधिकाºयांच्या पथकांनी ताब्यात घेतलेले संगणक आणि कागदपत्रांची छाननी केली असता एकूण१५ रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघडकीस झाले.
चार रुग्णालयांना योजनेतून काढले
कोल्हापूर शहरातील तीन आणि इचलकरंजी येथील संजीवनी हॉस्पिटल या चार रुग्णालयांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने या चारही रुग्णालयांना यादीतून काढण्यात आले आहे.
अजून पाच रुग्णालये रडारवर
शुक्रवारपासून कोल्हापूर शहरासह२२ जिल्ह्यांत ही कारवाई सुरू असून, सोमवारीही डॉक्टरांची दोन पथके शहर कार्यरत होती. आणखी पाच रुग्णालये त्याच्या ‘रडार’वर आहेत. त्यांच्या कागदपत्रांची छाननी आणखी सखोलपणे करण्यात येत असून, त्यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.
११ रुग्णालयांचे निलंबन
शहर आणि जिल्ह्यातील ११ रुग्णालयांचे निलंबन केले आहे. या रुग्णालयांचे स्पष्टीकरण जर मान्य करण्याजोगे असेल तर ते मान्य करून पुन्हा या रुग्णालयांना यादीवर घेता येणार आहे. मात्र, समाधानकारक खुलासा न केल्यास यातील रुग्णालयांनाही यादीतून काढून टाकण्यात येणार आहे.
‘आरोग्य मित्रां’वर होणार कारवाई
रुग्णालयाबरोबर रुग्णांची कागदपत्रे घेणारे ‘आरोग्य मित्र’ या मोहिमेमुळे अडचणीत आले आहेत. या ‘आरोग्य मित्रां’ची चौकशी करण्यात आली असून, पथकाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. ३४ रुग्णालयांत ‘आरोग्य मित्र’ कार्यरत आहेत. या कारवाईमुळे चार ते पाच ‘आरोग्य मित्र’ अडचणीत आल्याचे सांगण्यात आले.
रुग्ण हलविण्यास सुरुवात
ज्या रुग्णालयांना यादीतून काढण्यात आले आहे आणि निलंबित करण्यात आले आहे, अशा रुग्णालयांमधून रुग्णांना हलविण्यास सुरुवात झाली आहे. अपात्र रुग्णालयांमध्ये जर उपचार घेतले गेले तर ते ग्राह्य धरले जाणार नसल्याने रुग्ण दुसºया रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत.