चंदनशिवे यांच्या वारसांना १५ लाखांचा धनादेश, प्रशासनाने जपली बांधीलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 03:34 PM2019-04-26T15:34:10+5:302019-04-26T15:35:49+5:30
कोल्हापूर : निवडणुकीचे काम करीत असताना आपल्यातीलच एका सहकाऱ्याचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन जिल्हा प्रशासनाने ...
कोल्हापूर : निवडणुकीचे काम करीत असताना आपल्यातीलच एका सहकाऱ्याचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन जिल्हा प्रशासनाने सामाजिक बांधीलकी जपली. विशेष म्हणजे गुरुवारी स्वत: जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मृत झालेले तलाठी जयंत चंदनशिवे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या हातात मदतीचा १५ लाखांचा धनादेश दिला.
निवडणूक कर्तव्यावर असताना सोमवारी (दि. २२) दसरा चौकात झालेल्या अपघातात तलाठी चंदनशिवे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. अपघातानंतर लगेचच जिल्हाधिकारी देसाई यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून अनुदान मंजूर करून घेतले. निधनानंतर तिसऱ्याच दिवशी ही रक्कम त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्दही करण्यात आली.
चंदनशिवे यांच्या पाचगाव येथील घरी जाऊन त्यांच्या पत्नींकडे धनादेश दिला गेला. तसेच कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खाचा डोंगर हलका करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी देसाई यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, गगनबावड्याचे तहसीलदार लुगडे उपस्थित होते.