कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंदमुळे १५ हजार कर्मचारी बसून, आयटी क्षेत्राचे १० कोटींचे नुकसान
By संदीप आडनाईक | Published: June 9, 2023 11:43 AM2023-06-09T11:43:50+5:302023-06-09T11:44:21+5:30
कर्मचाऱ्यांना आता शनिवारी सुटीच्या दिवशी कामावर यावे लागणार
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा ३१ तासांसाठी खंडित करण्यात आली होती. याचा फटका कोल्हापुरातील आयटी क्षेत्राला बसला. यामुळे या क्षेत्राचे सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोल्हापुरात वर्क फ्रॉम होमनुसार काम करणाऱ्या सुमारे १५ हजार कर्मचाऱ्यांना सक्तीने घरी बसावे लागले.
कोल्हापुरात बुधवारच्या हिंसक घडामोडीनंतर जिल्हा प्रशासनाने ३१ तासांसाठी इंटरनेट सेवा खंडित केली. मात्र याचा अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरातील आयटी पार्कमध्ये असलेल्या विविध कंपन्यांच्या शिफ्ट पहाटे तीन वाजल्यापासून सुरु होतात. यात अनेक बीपीओ कंपन्यांचा समावेश आहे. विमा, विविध सॉफ्टवेअर कंपन्यांपासून उद्योग व्यवसायांशी संबंधित सुमारे ३५० कंपन्यांसाठी अनेक कर्मचारी काम करतात. यात प्रत्यक्ष ऑफिसला येऊन काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे पाच हजार आहे, तर वर्क फ्रॉम होम काम करणारे १५ हजार कर्मचारी आहेत.
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद पडल्याने सायंकाळनंतरच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करता आले नाही. याबरोबरीनेच पहाटे सुरु होणाऱ्या आणि दुपारच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कार्यालयातील काम करता आले नाही. हे कर्मचारी कामावर आले परंतु इंटरनेटची सेवा खंडित असल्याने त्यांना कोणतेही काम करता आले नाही.
दरम्यान, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सांगितले, की जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सेवा अशाप्रकारे अचानक खंडित केल्यामुळे आयटी क्षेत्राचे सुमारे १० कोटी रुपयांचे तरी नुकसान झालेले आहे. अनेक बँका या सेवेतून वगळण्यात आल्यामुळे ज्यांच्या उलाढाली मोठ्या प्रमाणात आहेत, अशा कोल्हापूर जिल्ह्यातील किमान पाच ते सहा बड्या कंपन्यांनाही या सेवेतून वगळण्यात यायला पाहिजे हाेते. सर्वसामान्य व्यक्तींच्या सोशल मीडियावर बंधने आणता आली असती, मात्र सरसकट हा निर्णय लादण्यात आला.
शनिवारी करावे लागणार काम
अनेक कंपन्या या लीज लाईनवर काम करतात तर काही कंपन्या फायबर ऑप्टिकलने पुरविण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवांवर अवलंबून होत्या. या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणतेही काम दिवसभरात करता आले नाही. त्यामुळे त्यांना सक्तीने घरी जावे लागले. या कर्मचाऱ्यांना आज मिळालेल्या सुटीमुळे त्यांच्या शनिवारच्या सुटीवर गंडांतर आले आहे. या कर्मचाऱ्यांना आता शनिवारी सुटीच्या दिवशी कामावर यावे लागणार आहे.