कोल्हापूर जिल्ह्यातून १५ हजारजणांनी दिली महाटीईटी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:51 PM2024-11-11T12:51:42+5:302024-11-11T12:53:11+5:30

तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाली परीक्षा

15 thousand people from Kolhapur district gave TET exam | कोल्हापूर जिल्ह्यातून १५ हजारजणांनी दिली महाटीईटी परीक्षा

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) शहरातील २७ परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडली. जिल्ह्यातून १४ हजार, ९३६ उमेदवारांनी ही परीक्षा दिली, तर ८४५ जण गैरहजर राहिले. तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही परीक्षा झाली. कोणताही अनुचित प्रकार परीक्षेच्या वेळी घडला नाही. दिवसभरात दोन पेपर झाले.

शहरातील २७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा परिषदेकडून स्वतंत्र एजन्सी नेमली होती. परीक्षार्थीची फेस रिडींगसह बायोमेट्रिक हजेरी घेतली. प्रत्येक केंद्रावरील परीक्षा खोलीत सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली. विभागीय अधिकाऱ्यांसोबत पथकाने व्हिडीओ चित्रीकरण केले. पहिल्या पेपरला ६ हजार १०४ पैकी ५ हजार ७६० परीक्षार्थी बसले. ३४४ परीक्षार्थी गैरहजर राहिले. दुसऱ्या पेपरला ९ हजार ६७७ पैकी ९ हजार १७६ परीक्षार्थी हजर होते. ५०१ परीक्षार्थी गैरहजर होते.

परीक्षेसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सकाळपासूनच विविध केंद्रांवर गर्दी झाली. परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था शोधताना अनेकांची दमछाक झाली. कक्षात प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाली. केंद्राबाहेर उमेदवारांनी रांगा केल्या. सकाळी दहा वाजता पहिला पेपर सुरू झाला. परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षक भरतीसाठी पात्र ठरवले जातील. केंद्रावर सहा परीरक्षकांचे बैठे पथक नियुक्त केले होते. 

७ झोनल ऑफीसर, २८ परीक्षा केंद्र संचालक, ४ उपकेंद्र संचालक, २८ सहायक परीरक्षक, एक जिल्हा परीरक्षक, ८७ पर्यवेक्षक, ४२३ समवेशक, ५८ लिपिक, ११६ सेवक अशा सुमारे ७५२ जणांनी परीक्षेचे कामकाज पाहिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

असे होते परीक्षेचे स्वरूप

पहिल्या पेपरसाठी मराठी ३०, गणित ३०, परिसर अभ्यास ३०, बाल मानसशास्त्र ३०, इंग्रजी ३० अशा १५० गुणांची प्रश्नपत्रिका होती. दुसऱ्या पेपरला मराठी ३०, गणित ३०, बालमानसशास्त्र ३०. इंग्रजी ३० विज्ञान ३०, समाजशास्त्र ३० असे १५० गुणांचे प्रश्न होते.

Web Title: 15 thousand people from Kolhapur district gave TET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.