खेळता खेळता चिमुकला विहिरीत पडला, १५ वर्षीय नम्रताने जीवाची पर्वा न करता चिमुकल्याचा जीव वाचवला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:49 AM2022-10-29T11:49:00+5:302022-10-29T11:50:41+5:30
भाऊ ओजस जोरजोरात ओरडू लागल्याने नम्रताने पळत येवून वाचवले शौर्यचे प्राण
रोहित तवंदकर
दानोळी : दानोळी येथील जयसिंगपूर-दानोळी रस्त्यावरील कटारे मळ्यातील १५ वर्षीय नम्रता कलगोंडा कटारे हिच्या दक्षतेमुळे व तत्परतेने तिच्या ३ वर्षीय भाच्याचे प्राण वाचले. खेळता खेळता शौर्य विहिरीत पडला असता आपल्या जीवाची पर्वा न करता नम्रताने विहिरीत उडी घेवून शौर्यचा जीव वाचवला. तिच्या या धाडसाबद्दल परिसरात कौतूक होत आहे.
घटना अशी की, दुपारची वेळ, घरातील लोक कामात व्यस्त होते. दिवाळी सुट्या असल्याने शौर्य व त्याचा भाऊ ओजस अंगणात खेळत होते. खेळता खेळता गेटच्या बाहेर पावसाने साचलेल्या पाण्यात खेळण्यात मग्न झाले होते. घराशेजारी असलेली विहीर पाण्याने तुडूंब भरली होती. खेळत खेळत शौर्य त्या विहिरीत जाऊन पडला. यावेळी पाच वर्षांचा त्यांचा भाऊ ओजस जोरजोरात ओरडू लागला. ओजस का ओरडत आहे हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या नम्रताला शौर्य विहिरीत बुडत असल्याचे दिसले.
यावेळी क्षणाचा ही विलंब न करता नम्रताने विहीत उडी घेतली व शौर्यचे प्राण वाचवले. नुकतीच पोहायला शिकलेली नम्रताच्या धाडला राम शिंदे, दानोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक, गावातील नागरिकांनी कौतुक केले.
नम्रताने धाडस केलं म्हणून आज आम्ही माझा मुलगा शौर्यला पाहु शकलो. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. - जयकुमार कटारे, दानोळी
ओजसचा आरडाओरडा एेकून मी बाहेर आले, विहिरीत बुडत असलेल्या शौर्यला पाहून उडी मारुन त्याला बाहेर काढले. - नम्रता कटारे