Kolhapur: जादा परताव्याचे आमिषाने १५० कोटींची फसवणूक, जयसिंगपुरातून एजंट गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 04:15 PM2024-07-11T16:15:30+5:302024-07-11T16:16:33+5:30

कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ

150 crore fraud with lure of extra refund, agent missing from Jaisinghpur Kolhapur | Kolhapur: जादा परताव्याचे आमिषाने १५० कोटींची फसवणूक, जयसिंगपुरातून एजंट गायब

Kolhapur: जादा परताव्याचे आमिषाने १५० कोटींची फसवणूक, जयसिंगपुरातून एजंट गायब

जयसिंगपूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून जयसिंगपूर शहरातील हजारो गुंतवणूकदारांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. शासकीय नोकरदार, व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर आणि व्यापाऱ्यांना गंडा घालून आठ ते दहा एजंट गायब झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

शिरोळ तालुक्यातील अनेक प्रमुख गावात शेअर मार्केटच्या साखळीतील एजंटांनी फसवणुकीचे मोठे जाळे विणले आहे. अनेकांना परतावा मिळणे बंद झाले असून, मुद्दलदेखील अडकल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. महिन्याकाठी जादा परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या एजंटांची तालुक्यात साखळी तयार झाली होती.

त्यातून अनेकांना गुंतवणुकीचे सल्ले देण्यात आले. शिवाय गुंतवणूक करण्यासही भाग पाडण्यात आले. जादा परताव्याच्या आमिषामुळे लाखोंचा आकडा कोटीत पोहोचला. काही महिने परतावा दिल्यानंतर गाशा गुंडाळून अनेक एजंटांनी पळ काढला. त्यामुळे मोठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी चांगलाच धसका घेतला आहे.

गुंतवणुकीचा आकडा मोठा

आमिषाला बळी पडलेले गुंतणूकदार आता एकत्रित येत आहेत. पैसे वसुलीचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या गावांमध्ये शेअर मार्केटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. त्यामुळे तालुक्यातील गुंतवणूकदारांची ४०० ते ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांचा ससेमिरा वाढल्यामुळे आता हे प्रकरण अंगलट येणार म्हणून अनेक एजंट गायब झाले आहेत. यातून अंग काढण्यासाठी त्यांच्याकडून नवनवीन क्लुप्त्या सुरू आहेत.

शेअर मार्केटचा फंडा

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून जादा पैशांचे आमिष दाखवून अनेकांना एजंटांनी गंडा घातला आहे. यामध्ये व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. जयसिंगपुरातील एका बांधकाम ठेकेदाराचाही यात समावेश आहे. गुंतवणूक कार्यालयाचे उद्घाटन करायला गेलेल्या अधिकाऱ्यालाही २० लाखाला गंडा घातला आहे. अनेकांनी कर्ज काढून पैशांची गुंतवणूक केल्यामुळे न्यायप्रविष्ठ मार्गाने पैसे कसे मिळतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांत जाण्याची तयारी केली आहे.

Web Title: 150 crore fraud with lure of extra refund, agent missing from Jaisinghpur Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.