शैक्षणिक खर्चात दहा वर्षांत १५० टक्के वाढ

By admin | Published: June 8, 2015 12:20 AM2015-06-08T00:20:10+5:302015-06-08T00:53:11+5:30

‘अ‍ॅसोचेम’च्या अहवालातील निष्कर्ष : पगारातील ४० टक्के वाटा मुलांच्या शिक्षणावर खर्च

150% increase in education costs in ten years | शैक्षणिक खर्चात दहा वर्षांत १५० टक्के वाढ

शैक्षणिक खर्चात दहा वर्षांत १५० टक्के वाढ

Next

इग्रजी माध्यमांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले असून याचे लोण आता ग्रामीण भागातदेखील पोहोचले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा श्रीमंत किंवा नवश्रीमंतांना आकर्षित करीत आहेत. गेल्या दहा वर्षांत खासगी शाळांच्या फीमध्ये तब्बल १५० टक्के वाढ झाल्याचे अ‍ॅसोचेम संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. पालकांचा एक अपत्याकडे कल वाढण्यामागे वाढता शैक्षणिक खर्च हे एक कारण ठरत आहे.
शैक्षणिक खर्च वाढत असला तरी सरकारी शाळांचा घसरणारा दर्जा आणि अनुकरणप्रियता यामुळे शहरी आणि निमशहरी भागातील पालकांचा ओढा आपल्या पाल्यांना खासगी शाळामध्ये घालण्याकडेच आहे. शैक्षणिक खर्च वाढत असला तरी पालकांचे उत्पन्न मात्र त्या तुलनेत वाढत नाही. परिणामी आरोग्य आणि इतर आवश्यक गरजाची पूर्तता करताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुलांचा शाळेचा खर्च झपाट्याने वाढत असून गेल्या १० वर्षांत यात १५० टक्क्यांची वाढ झाल्याचे अ‍ॅसोचेमने म्हटले आहे. अ‍ॅसोचेम सोशल डेव्हलपमेंट फौंडेशनने (एएसडीएफ) केलेल्या ‘वाढत्या शैक्षणिक खर्चाचा पालकांवर भार’ या पाहणीत असे आढळून आले की, २००५ मध्ये मोठ्या शहरात खासगी शाळांची शैक्षणिक फी ५० हजाराच्या आसपास होती. ती २०१५ मध्ये १ लाख २५ हजारपर्यंत (वार्षिक) पोहोचली आहे, तर निमशहरी भागात १० हजारांवरून तब्बल ७० ते ९० हजारांपर्यंत पोहोचली आहे.
एप्रिल-मे २०१५ दरम्यान देशातल्या प्रमुख शहरांतील १६०० पेक्षा जास्त पालकांच्या मुलाखती घेत ही पाहणी करण्यात आली. यावेळी १० पैकी ९ पालकांनी शैक्षणिक खर्चाची जुळवाजुळव करणे अतिकठीण बनत असल्याचे मान्य केले. अनेकवेळा अवाढव्य खर्चामुळे आपल्या मनातील शाळेवर पाणी सोडावे लागते, असे मत १० टक्के पालकांनी व्यक्त केले, तर जवळपास ७० टक्के पालकांनी आपल्या पगारातील जवळपास ३० ते ४० टक्के रक्कम ही शिक्षणावर खर्च होत असल्याचे सांगितले. याचा परिणाम कुटुंबाच्या एकूण बजेटवर होत आहे. वाढलेल्या खर्चात गणवेश, पुस्तके, स्टेशनरी, वाहतूक, खेळाच्या घडामोडी, शालेय सहली, शालेय मदत आदी गोष्टींचा समावेश होतो.
महागाईचा विचार केल्यास शिक्षणाचा खर्च महागाई दराच्या दुप्पट वेगाने वाढत आहे. वाढीचा हा वेगच चिंतेचा विषय असून शिक्षण हे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाण्याची लक्षणे आहेत. ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना शैक्षणिक खर्चाचा फार मोठा फटका बसत आहे.
पाहणीत असे दिसून आले की, खर्च वाढण्यात प्रामुख्याने विशिष्ट गणवेशांची सक्ती, ब्लेझर, पुलओव्हर अशा प्रकारचे पाश्चात्त्य गणवेश, एकाच विक्रेत्याकडून खरेदीसाठी शाळांचा दबाव याचा एकंदरीत परिणाम खर्चावर पडत आहे. शाळा आणि विक्रेत्यांमधील युतीमुळे पालकांना अवास्तव पैसे खर्च करावे लागत आहेत. वााढणारी ट्युशन फी, वाहतूक खर्च, विकासनिधी, विविध कार्यक्रमासाठी लागणाऱ्या पैशामुळे कुटुंबाला वार्षिक सुटी, घरातील काम आणि इतर खर्चावर पाणी सोडावे लागत असल्याचे मत ८० टक्के पालकांनी व्यक्त केले.

Web Title: 150% increase in education costs in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.