कोल्हापूर: चोरीस गेलेले १५ लाख रुपये किमतीचे १५० मोबाईल जप्त, मूळ मालकांना केले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 11:55 AM2022-08-25T11:55:00+5:302022-08-25T11:56:03+5:30
या कामगिरीबद्दल पथकाला १० हजारांचे बक्षीसही जाहीर
कोल्हापूर : जिल्ह्यातून २०१९ पासून अनेकजणांचे मोबाईल गहाळ झाले होते. या मोबाईलचा सायबर पोलीस ठाण्याकडून शोध सुरू होता. तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवून येथील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकातून १५ लाख रुपये किमतीचे १५० मोबाईल संच हस्तगत केले. ते मूळ मालकांना बुधवारी परत केले. या कामगिरीबद्दल पथकाला १० हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दिवसेंदिवस मोबाईल चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशा चोरट्यांवर अंकुश ठेवणे आणि गहाळ मोबाईल शोधून काढणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी तानाजी सावंत आणि कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेतली होती. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून या ठाण्यातील कर्मचारी अमर वासुदेव, सागर माळवे, रवींद्र पाटील, प्रदीप पावरा हे तांत्रिक तपास करीत होते. या कामात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे असिफ कलायगार, सुरेश पाटील यांच्यासह पथकाने विशेष सहकार्य केले. त्यामुळे कर्नाटकातून ५५ आणि महाराष्ट्रातून ९५ असे १५० मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
मूळ मालकांना आतापर्यंत २६७ मोबाईल परत
आतापर्यंत या पथकाने २६७ मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. त्यांची किंमत सुमारे २६ लाख इतकी आहे. ही मोहीम यापुढे सुरू ठेवली जाणार आहे. यात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केल्याची माहिती पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली.