सात महिन्यांत कोल्हापुरातून १५८ अल्पवयीन मुली बेपत्ता, किती मुली सापडल्या.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 04:56 PM2024-08-12T16:56:32+5:302024-08-12T16:56:52+5:30
पालकांच्या जिवाला घोर
कोल्हापूर : अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सात महिन्यांत १५८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या नोंदी पोलिस ठाण्यांमध्ये झाल्या आहेत. यातील १४४ मुलींचा शोध घेण्यात पोलिस आणि नातेवाइकांना यश आले. मात्र, १४ मुली अद्याप सापडल्या नाहीत. गेल्या वर्षी बेपत्ता झालेल्या १५८ मुलींपैकी ३९ मुलींचा अजूनही शोध सुरूच आहे. पालकांसाठी काळजाचा तुकडा असलेल्या मुली अशा एकाएकी बेपत्ता होत असल्याने पालकांना धक्का बसत आहे.
शाळेला गेली ती परत आलीच नाही
काही मुली शालेय वयातच प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. अल्लड वयात समज नसल्याने त्या सहज आमिषाला बळी पडतात. त्यामुळे शाळेला जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली मुलगी परत येतच नसल्याने नातेवाइकांना पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागते. बेपत्ता झालेल्या मुलींपैकी अनेक मुली शाळेला जाते असे सांगून गेल्या आणि बेपत्ता झाल्याचे पोलिस सांगतात.
१५८ गेल्या ; १४४ परत मिळाल्या
गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यातील १५८ अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्या. यातील १४४ मुलींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना परत आणले. यातील काही मुलींचे समुपदेशन करून बाल न्यायालयाच्या आदेशाने त्यांना पालकांकडे सोपवले, तर काही मुलींची रवानगी सुधारगृहात केली. १४ मुलींचा शोध सुरूच आहे.
गेल्या वर्षीच्या ३९ मुलींचा शोध सुरूच
गेल्या वर्षी १५६ मुली घरातून बेपत्ता झाल्या. त्यापैकी ११७ मुलींचा शोध लागला. ३९ मुली अजूनही सापडलेल्या नाहीत. त्या राज्याबाहेर पळाल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे. सुगावा लागताच त्यांना ताब्यात घेऊन परत आणले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पालकांच्या जिवाला घोर
तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या मुली मोठ्या होताच स्वतंत्र विचार करू लागतात. आई, वडील त्यांच्या हिताचाच विचार करतात, यावर त्यांचा विश्वास राहत नाही. प्रेमाच्या जाळ्यात अडकून क्षणिक आनंदासाठी त्या घर सोडतात. मात्र, त्यांच्या कृतीने पालकांच्या जिवाला घोर लागतो. मानसिक धक्क्यामुळे अनेक पालकांवर औषधोपचार घेण्याची वेळ येते.
अपहरणाचा गुन्हा
अल्पवयीन मुलगी अथवा मुलगा बेपत्ता झाल्यास कायद्याच्या भाषेत त्याचे अपहरण झाले, असेच समजले जाते. त्यामुळे पोलिस ठाण्यात नोंद होताना अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.