अट्टल चोरट्यांकडून १६ घरफोड्या उघड
By admin | Published: May 15, 2016 12:59 AM2016-05-15T00:59:09+5:302016-05-15T00:59:09+5:30
तिघांची टोळी : सात लाखांचे दागिने, ८५ हजार रुपये हस्तगत
कोल्हापूर : कांदा-बटाटा व्यापाराच्या नावाखाली घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीकडून शाहूवाडी पोलिसांनी शाहूवाडीसह कोडोली, वडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील १६ घरफोड्या उघडकीस आणल्या. त्यांच्याकडून सात लाखांचे सोन्याचे दागिने व ८५ हजार रुपये हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शाहूवाडी पोलिस दि. २८ एप्रिल रोजी रात्रीची गस्त घालत असताना त्यांनी संशयितरीत्या निघालेल्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला; परंतु तो न थांबता सुसाट निघून गेला. पोलिस नाईक एम. वाय. पाटील यांनी संशयितरीत्या टेम्पो कोल्हापूरच्या दिशेने गेला असल्याची वर्दी जिल्हा नियंत्रण कक्षास दिली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी संबंधित टेम्पोस दसरा चौक येथे ताब्यात घेऊन त्यांना शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी संशयित आरोपी सागर जयवंत कदम (वय २९, रा. तळसंदे , ता. हातकणंगले), रेखा अर्जुन गोसावी (२८), मंगल सुभाष गोसावी (३९, दोघी रा. वडणगे, ता. करवीर) यांना अटक करुन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी घरफोड्यांची कबुली दिली, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी (पान १ वरून) अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, अमर जाधव, निरीक्षक अशोक धुमाळ, आदी उपस्थित होते.
घरफोडीचा प्लॅन
सागर कदम यांचा हौदा टेम्पो आहे. त्याची रेखा गोवासी व मंगल गोसावी या महिलांशी ओळख झाली. त्यांनी घरफोडी करण्यासाठी नवीन शक्कल लढविली. कांदा-बटाटा विक्रीच्या नावाखाली ते गावोगावी फिरू लागले. गावात फिरताना बंद घरांची टेहाळणी करीत असत. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांनी या व्यवसायाच्या नावाखाली शाहूवाडी, कोडोली, वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ घरफोड्या केल्या. सागर हा स्क्रूड्रायव्हरने बंद घराचे कडी-कोयंडा उचकटून काढत असे. बाहेर रेखा व मंगल लोकांच्यावर पाळत ठेवत असत. गावामध्ये आरोळी देऊन ते कांदा-बटाटा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने ते चोरटे असतील, अशी शंका कोणालाच येत नव्हती. त्यांनी चोरीचे दागिने सराफाला विक्री केले होते. ते पोलिसांनी हस्तगत केले. सागर हा पोलिस रेकॉर्डवर पहिल्यांदाच आला आहे. त्याचे लग्न झाले असून, त्याला दोन मुले आहेत. तो आई, वडील, भाऊ यांच्यापासून विभक्त राहतो. (प्रतिनिधी)