‘जुना राजवाडा’तील १६ जण हद्दपारीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:48+5:302021-09-08T04:30:48+5:30
कोल्हापूर : गणेशोत्सव शांतता व निर्भय वातावरणात उत्साहाने पार पाडावा, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ...
कोल्हापूर : गणेशोत्सव शांतता व निर्भय वातावरणात उत्साहाने पार पाडावा, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ जणांना गणेशोत्सव कालावधीत शहर व तालुका कार्यक्षेत्रातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव करवीर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती जुना राजवाडाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी पत्रकारांशी मंगळवारी बोलताना दिली.
हद्दपारीच्या दिलेल्या प्रस्तावामध्ये विकी ऊर्फ विक्रम राजेंद्र पोलादे (रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ), प्रवीण प्रकाश लिमकर (रा. हरिओमनगर, अंबाई टँक रोड), सचिन दिलीप तोडकर (रा. आझाद चौक, रविवार पेठ), अभिजित माणिकराव कुदळे (रा. टिंबर मार्केट), स्वप्निल संजय चौगले (रा. फिरंगाई तालीम, शिवाजी पेठ), सागर लक्ष्मण कुरडे (रा. वारे वसाहत), सचिन बबरू गायकवाड (रा. सुधाकर जोशीनगर झोपडपट्टी), प्रताप शशिकांत देसाई (रा. साकोली कॉर्नर), संतोष नारायण मंझाले (रा. सुधाकर जोशीनगर), रोहित दीपक भाले (रा. नाळे कॉलनी), प्रकाश विलासराव सावंत (रा. इंगळे बोळ, मंगळवार पेठ), प्रदीप दयानंद सरवदे (रा. न्यू कणेरकरनगर), अंकुश नामदेव कोंडारे (रा. मैलखड्डा, संभाजीनगर), रणजित पांडुरंग मोरस्कर (रा. रंकाळा टॉवर), रोहित नारायण केसरकर (रा. बोंद्रे गल्ली, शिवाजी पेठ), कपिल राजेंद्र केसरकर (रा. गंजी गल्ली).
मिरवणूक, वाद्यांच्या वापरावर कारवाई
गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटीस बजावली असून कोणत्याही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आगमन अगर विसर्जन मिरवणूक काढण्याचा किंवा त्यासाठी वाद्यांचा वापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढेही गणेशोत्सव कालावधीत उपद्रव निर्माण करणाऱ्या इतर आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नाळे यांनी सांगितले.